आय लव मोहम्मद बॅनरवरील कारवाई थांबवावी
आय लव मोहम्मद बॅनरवरील कारवाई थांबवावी
कुलाबा, ता. ९ ः आय लव मोहम्मद म्हणजे शांतता, सलोखा आणि श्रद्धेचा मार्ग, त्यामुळे सरकारने या पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी जमाते इस्लामी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाटकर यांनी केली आहे. मुस्लिम बांधवांनादेखील मुक्तपणे पैगंबरांवरील प्रेम प्रकट करण्याचा नैसर्गिक आणि संवैधानिक अधिकार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात या संदर्भात भाटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. अलीकडच्या काळात प्रेषित मुहम्मद यांच्याविषयी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारे पोस्टर्स व बॅनर्स हे शांततेचे व श्रद्धेचे प्रतीक असूनही, त्यावर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. पोस्टर लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, अटक केली जात आहे. या कारवाईमुळे मुस्लिम समाजमनाला वेदना होत आहेत. या कृतीमुळे जातीय सलोखा, सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मतेवर दूरगामी व धोकादायक परिणाम होऊ शकतात, अशा इशारा भाटकर यांनी दिला. देशात सर्वधर्मीयांची श्रद्धास्थाने सर्वांसाठी पवित्र आहेत. पैगंबर मुहम्मद यांचे जीवन आणि शिकवण जगभरातील कोट्यवधी लोकांना करुणा, न्याय आणि शांतीच्या मूल्यांनी प्रेरित करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.