वीज कामगारांचा ७२ तासांचा संप सुरू

वीज कामगारांचा ७२ तासांचा संप सुरू

Published on

वीज कामगारांचा ७२ तासांचा संप सुरू
खासगीकरणाला तीव्र विरोध

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ७२ तासांचा संप सुरू केला आहे. महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रांमध्ये अदाणी, टोरंटोसारख्या खासगी भांडवलदारांना वीज वितरणाचे परवाने देण्यास असलेला विरोध हे या संपाचे प्रमुख कारण आहे. कल्याणमधील तेजश्री या महावितरणच्या कार्यालयाबाहेर वीज कामगारांनी हा संप सुरू केला आहे. कृती समितीने घेतलेल्या या निर्णयानुसार, वीज कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

महावितरण कंपनीत पुनर्रचना आणि कामगार कपात थांबवणे. ३२९ विद्युत उपकेंद्रे खासगी ठेकेदारांना चालविण्यास देण्यास विरोध, महानिर्मिती कंपनीच्या चार जलविद्युत केंद्रांचे खासगीकरण रद्द करणे. महापारेषण कंपनीचे २०० कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे थांबवणे. पारेषण कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे. रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह तत्काळ भरणे. कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे. पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या इतर समस्या सोडवणे इत्यादी मागण्यांसाठी संप सुरू आहे.

वाढत्या वीज ग्राहक संख्येनुसार चांगली सेवा देण्यासाठी शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयांची निर्मिती करणे. महावितरण कंपनीने विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे मिळावे, महसुलात वाढ व्हावी आणि वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळावी. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हा ७२ तासांचा संप सुरू राहणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com