स्फ़ोटकाच्या उंबरठ्यावर उल्हासनगर शहर!

स्फ़ोटकाच्या उंबरठ्यावर उल्हासनगर शहर!

Published on

स्फोटकांच्या उंबरठ्यावर उल्हासनगर!
शहरातील गर्दीच्या भागांत अवैध फटाक्यांचा साठा; अपघात होण्याची भीती

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) ः उल्हासनगर शहर आधीच भुयारी गटारांची कामे आणि अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या कामांमुळे प्रदूषणाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. त्यातच, आता शहरातील फटाका विक्रेत्यांनी नियम पायदळी तुडवत केलेल्या अवैध फटाक्यांच्या मोठ्या साठ्यामुळे उल्हासनगरमध्ये स्फोट आणि मोठ्या दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. मागील वर्षी मुरबाड रस्त्यावरील एका फटाक्याच्या गोदामात झालेल्या भयंकर स्फोटात उल्हासनगरातील व्यापारी मनीष नारंगचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरांतील फटाका विक्रेते आणि त्यांच्या गोदामांच्या सुरक्षा व्यवस्थेची स्थिती गांभीर्याने तपासली जात आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

उल्हासनगरमधील अनेक फटाका विक्रेत्यांनी शहराच्या गर्दीच्या आणि रहिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा अवैध साठा केला आहे. विशेषतः बंदी घातलेले आणि नियमबाह्य फटाके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गोदामांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त स्फोटके साठवली गेली आहेत, ज्यामुळे दुर्घटनेची शक्यता प्रचंड वाढली आहे. याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. परिणामी, शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील काही प्रमुख फटाका विक्रेते नियमबाह्य व्यवसाय करण्यासाठी दरवर्षी पोलिस आणि प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय करत आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जात आहे. हे विक्रेते प्रशासनाशी संगनमत करून आपले धोकादायक व्यवसाय चालवत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

१०० कोटींच्या साठ्याची शक्यता
उल्हासनगर शहरातील नेहरू चौक, उल्हासनगर-२ आणि इतर गर्दीच्या भागांतील गोदामांमध्ये नियमांचे पूर्ण उल्लंघन करून अवैध साठे ठेवले जात आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. जर या भागांमध्ये अचानक छापेमारी केली, तर अंदाजे १०० कोटी रुपयांच्या फटाक्यांचा साठा बाहेर येऊ शकतो, असे बोलले जात आहे. हे विक्रेते घाऊकमध्ये व्यवसाय करत असून, ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत फटाक्यांचा पुरवठा करतात, ज्यामुळे प्रदूषणाच्या संकटासोबतच दुर्घटनेची भीतीही वाढली आहे.

कडक कारवाईची मागणी
शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शहरातील सर्व अवैध फटाका गोदामांवर छापे टाकून सुरक्षा नियमांचे योग्य पालन केले जात आहे की नाही, याची कसून तपासणी करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, भविष्यात मोठ्या अपघाताचे गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागतील, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com