सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना दणका

सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना दणका

Published on

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील घोडबंदर परिसरात चालणारे सहा तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्प (आरएमसी) तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केले आहेत. प्रकल्प बंद न केल्यास पर्यावरण कायद्यातील तरतूदीनुसार पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही मंडळाकडून देण्यात आला आहे.

घोडबंदर परिसरात रहिवासी क्षेत्रालगत मोठ्या संख्येने आरएमसी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमधून होत असलेल्या प्रदूषणाने आसपासच्या रहिवाशांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार तकारी केल्यानंतरही ठोस कारवाई केली जात नव्हती. ही बाब परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पर्यावरण तथा वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी प्रकल्पांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या, तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी घालून देण्यात आलेल्या अटी शर्तींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे त्यांना दिसून आले.

ही कारवाई फक्त सुरुवात आहे. शहरातील सर्व प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी ही लढाई सातत्याने सुरू राहील, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

या नियमांचे उल्लंघन
अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपासणी अहवालानुसार, आरएमसी मिक्सिंग प्रकल्प झाकलेला नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. साठवण व कार्यक्षेत्रात पाणी शिंपडण्याची कोणतीही सोय नव्हती. तसेच नियमानुसार ३० फूट उंच संरक्षक कठड्यांऐवजी ऐवजी फक्त १० फूट पत्र्याची भिंत उभारण्यात आली होती. आरएमसी वाहून नेणाऱ्या मिक्सर वाहनांसाठी टायर धुण्याची सुविधा नव्हती, तसेच सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन (काँक्रीट पिट) उपलब्ध नव्हते. त्याचसोबत वायू गुणवत्तेचे निरीक्षण यंत्रदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हरशी जोडलेले नव्हते. या त्रुटींमुळे परिसरात धूळ आणि वायूप्रदूषण वाढून नागरिकांना आरोग्य धोका निर्माण झाल्याचे नमूद आहे.

या प्रकल्पांना दणका
मंडळाने विविध कायद्यांच्या तरतूदीनुसार लाईम स्टोन, ग्रेस सिमेंट्स, सोनम बिल्डिंग सोल्युशन्स, हिरकॉन इन्फ्रा, राज ट्रान्सिट इन्फ्रा प्रा. लि., जे. व्ही. आय. ॲडवान्स टेक्निकल एल.एल.पी. हे सहा आरएमसी प्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. तसेच प्रकल्पांची वीज व पाणीपुरवठा तातडीने खंडित करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com