रायगडकरांच्या ‘स्वामित्व’ला धक्का
रायगडकरांच्या ‘स्वामित्व’ला धक्का
घरे नसताना मिळकत पत्रिकांचे वाटप; योजना वादाच्या भोवऱ्यात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ ः केंद्र शासनाने २०२२ मध्ये स्वामित्व योजनेतून गावठाण जागेतील घरधारकांना मिळकत पत्रिका दिल्या आहेत. या योजनेंतर्गत ८०५ गावांमधील एक लाख २४ हजार ३७९ लाभार्थ्यांना ९० हजार १७३ मिळकत पत्रिका मिळाल्या आहेत; परंतु योजनेतील पळवाटा शोधून काही लोकांनी सरकारी मालकी असलेल्या गावठाणातील जमिनी बळकावल्या असल्याने योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रायगड जिल्ह्यात एक हजार ६३४ गावे आहेत. यातील एक हजार ५३४ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झाले असून फक्त १०० गावांचे सर्वेक्षण होणे शिल्लक आहे. अशातच अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या संगमपाडा गावामध्ये प्रॉपर्टी कार्ड क्रमांक १२४ मधील १५ गुंठे जागेत असलेला शासनाचा ग्रामपंचायत रस्ता बंद करून, त्याची परस्पर विक्री केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत स्तरावर विविध धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात पंचायत समिती अलिबागच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तातडीने पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
------------------------
काय आहे प्रकरण?
संगमपाडा येथील महेश मनोहर पेडणेकर व ग्रामस्थ मंडळी यांनी पंचायत समिती अलिबागकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. प्रॉपर्टी कार्ड क्र. १२४ मधील शासकीय जागेत असलेला ग्रामपंचायत रस्ता बंद करून, ग्रामपंचायत, ग्रामसेवकांच्या माध्यमातून जागा परस्पर विकल्याचा आरोप केला होता. त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे येथील अधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रारदार, उपसरपंच आणि सदस्यांच्या उपस्थितीत जागेवर जाऊन चौकशी केली. या वेळी संगमपाडा येथील या प्रकरणात प्रॉपर्टी कार्ड क्र. १२४ मधील काही कुटुंबीयांनी महाराष्ट्र शासनाच्या जागेवर सिटी सर्वेचा नकाशा पाडून व्यवहार केल्याचे निदर्शनास आले. तर ग्रामपंचायतीच्या नोंदीमध्ये अनेक घरे अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले.
---
संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून वस्तुजन्य पुराव्यानुसार याप्रकरणी महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या ३१ डिसेंबर २०१५ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तातडीने कार्यवाही केली. तसते त्याचा सविस्तर अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करावा, असे लेखी कळवण्यात आले आहे.
- दाजी दाईंगडे, गटविकास अधिकारी, अलिबाग पंचायत समिती
----
जमीन लाटण्याच्या प्रकारात ग्रामपंचायत, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारीही गुंतलेले असल्याने भूमाफियांना अशा प्रकारचे कृत्य करण्यास हिंमत होते. मिळकत पत्रिका मिळवून मालकी हक्क प्राप्त झाल्यानंतर जमिनी करोडो रुपयांमध्ये विकणे शक्य होत आहे. अलिबाग तालुक्यात काही लोकांनी हीच पद्धत सध्या वापरली आहे. स्वामित्व योजनेतील काही उणिवा दूर करणे गरजेचे आहे.
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ता
----
संगम गावामध्ये माझे वडिलोपार्जित घर असताना योजनेपासून वंचित ठेवत दुसऱ्याच्याच नावाने २०२२ मध्ये घरपट्ट्या लावून केवळ तीन महिन्यांत मिळकत पत्रिका देण्यात आलेल्या आहेत. एकाच कुटुंबासाठी पाच मिळकत पत्रिका देण्यात आलेल्या आहेत. १० बाय १० फुटाच्या घराच्या हक्कासाठी ७१ वर्षांच्या वयोवृद्धाला ग्रामपंचायत विभाग, भूमिअभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय येथे हेलपाटे मारीत आहेत.
- कृष्णा घाडी, नेहुली संगमपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.