दोन चिमुकल्या विकृतीच्या बळी
काही व्यक्तींसाठी विकृती हाच स्थायीभाव बनतो आणि एकदा केलेला गुन्हा पुन्हा पुन्हा करण्यास त्या निर्ढावल्या जातात. भिवंडीत एका नराधमाने याच विकृतीने पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले. कारागृहातून पसार झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच त्याने पुन्हा त्याच क्रूर पद्धतीने एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली. मात्र, भिवंडी पोलिसांनी अवघ्या पाच तासांत त्याचा थरारक पाठलाग करून त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या.
----------------------
- संजय भोईर, भिवंडी
भिवंडीतील फेणेगाव परिसरात चाळीतील एक सहावर्षीय चिमुरडी बेपत्ता १३ सप्टेंबर २०२३ मध्ये बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन दिवसांनी परिसरातूनच दुर्गंधी येऊ लागली. भिवंडी शहर पोलिसांनी तपास घेत चाळीतील एका बंद खोलीपर्यंत पोहचले. तेथे बादलीत कोंबलेला चिमुकलीचा मृतदेह आढळला.
संशयित म्हणून सलामत अन्सारी याचे नाव पुढे येताच त्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तो गावी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिस पथक बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावात पोहोचले. पोलिसांनी वेषांतर करून सलामत अन्सारी याला अवघ्या पाच दिवसांत अटक केली. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
सलामतला ४ ऑगस्टला भिवंडी न्यायालयात कारागृहातून घेऊन आले असता, पोलिसांची नजर चुकवून धूम ठोकली. तो पसार झाल्यानंतर शांतीनगर निजामपूर पोलिसांनी शहर व परिसरात त्याचा शोध घेण्यासाठी परिसर पिंजून काढला. पण तो काही सापडला नाही. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने कारवाई करीत जबाबदार पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
निर्ढावलेला नराधम भिवंडीच्या ग्रामीण भागात वास्तव्य करीत राहिला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काटई गावातील मांगत पाडा येथील भाड्याच्या खोलीत राहण्यास आला. अवघ्या पाच दिवसांत म्हणजेच १ सप्टेंबरला त्याने शौचालयाला जात असलेल्या सातवर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून आपल्या खोलीत खेचले आणि अत्याचार करून हत्या केली. मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत कोंबून पसार झाला.
दुपारी कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेत असताना सायंकाळी तीन तासांनी नराधमाच्या खोलीत मृतदेह आढळला. स्थानिक नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून मुलीचा मृतदेह बाहेर काढला. तिचे तोंड कुरकुरे भरलेले होते. कुटुंबीयांनी तिला स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात नेले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेथे आरोपीबाबत चौकशी करताना एका पोलिसाने मोबाईलमध्ये असलेला आरोपी सलामत अन्सारी याचा फोटो दाखवला. तो स्थानिकांनी ओळखल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले. एक गुन्हा करून कारागृहात असताना पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याच्या अवघ्या एक महिन्याच्या आतच तशाच पद्धतीचे दुसरे दुष्कृत्य करतो. सलामतचे हे कृत्य पोलिस प्रशासनाची बदनामी करणारे आणि तेवढेच आव्हानात्मक होते.
घटनास्थळावरूनच पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातील सर्व गुन्हे विभाग गोपनीय पथकाकडे या आरोपीचा फोटो पाठवून शोधकार्याला गती दिली. तोपर्यंत रात्र सुरू झाल्याने तो पुन्हा शहराबाहेर पळून जाण्याची शक्यता होती. यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे पोलिस पाळत ठेवून होते. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता तो दिवाण शहा परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. निजामपुरा पोलिसांसह स्थानिक भोईवाडा पोलिस पथकाने तलाव परिसरात सलामत आढळून आला. भोईवाडा पोलिस पथकाने त्याच्या मुसक्या आवळून निजामपूर पोलिसांकडे त्याला सोपविले. अवघ्या पाच तासांत आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.