त्रिपुरी पौर्णिमेला किल्ले दुर्गाडीवर रोषणाईची परवानगी द्या
त्रिपुरी पौर्णिमेला किल्ले दुर्गाडीवर रोषणाईची परवानगी द्या
माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांकडे मागणी
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला हजारो दिव्यांनी उजळून निघतो; मात्र मागील वर्षापासून किल्ल्याच्या ठरावीक भागातच ही रोषणाई करण्याची पोलिसांकडून परवानगी मिळत आहे. त्यामुळे यंदा संपूर्ण किल्ल्यावर दिव्यांची रोषणाई करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे मागणी केली आहे.
दीपावलीनंतर येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा उत्सव मंडळातर्फे हजारो पारंपरिक पद्धतीच्या दिव्यांनी किल्ले दुर्गाडी उजळून निघतो. दरवर्षी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने किल्ल्याच्या सर्व भागांवर रोषणाई केली जात असे; मात्र गेल्यावर्षी स्थानिक पोलिस प्रशासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या केवळ काही भागापुरतीच परवानगी दिल्याने पूर्ण किल्ला उजळण्याची परंपरा खंडित झाली आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच नुकताच कल्याण न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार किल्ले दुर्गाडी ही मालमत्ता राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले आहे; मात्र स्थानिक पोलिस प्रशासनाकडून संपूर्ण किल्ल्यावर रोषणाईला परवानगी नाकारल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संपूर्ण किल्ल्यावर दिव्यांची रोषणाई करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करताना म्हटले आहे, ‘गेल्या पाच दशकांहून अधिक काळ हा उत्सव श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. कल्याणसह आसपासच्या परिसरातील हजारो नागरिक या दिवशी किल्ल्यावर उपस्थित राहतात. त्यामुळे या पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवात कोणतीही अडचण न आणता संपूर्ण किल्ल्यावर पणत्यांची रोषणाई करण्यास परवानगी देण्यात यावी.’
राज्य सरकारकडून सकारात्मक परिणाम
येत्या ५ नोव्हेंबर रोजी असलेल्या त्रिपुरी पौर्णिमेनिमित त्रिपुरी पौर्णिमा उत्सव मंडळाने यंदाही सर्व धार्मिक विधी, सुरक्षा नियम आणि पर्यावरणीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्याची नेहमीप्रमाणे तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलेल्या या मागणीवर राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.