सुतारवाडी येथे आदिवासी मेळाव्याला प्रतिसाद
सुतारवाडी येथे आदिवासी मेळाव्याला प्रतिसाद
५० लाख निधी मिळवनू देण्याचे खासदारांचे आश्वासन
रोहा, ता. १३ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे रायगड जिल्हा आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हजारो आदिवासी बांधवांनी उत्साहात सहभाग घेतला. समाजातील ऐक्य, प्रगती आणि हक्कासाठी लढा या भावनेने आयोजित या मेळाव्याला खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आदिवासी समाज हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक असून, त्यांचे प्रश्न ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजाच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार आणि सांस्कृतिक ओळख जपणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कोलाड येथे आदिवासी समाजासाठी स्वतंत्र सभागृह उभारण्यात येणार असून, या कामासाठी शासनाकडून तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तटकरे म्हणाले की, आदिवासी समाजातील कुठलाही व्यक्ती उपेक्षित राहू नये, ही आमची जबाबदारी आहे. एक व्यक्ती दुसऱ्या समाजात गेली तरी त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही, कारण संपूर्ण आदिवासी समाज एकत्र आहे आणि एकदिलाने उभा आहे. त्यांनी समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित करत, तुमच्या हक्कांसाठी आम्ही कायम सोबत आहोत, असा ठाम विश्वास उपस्थितांना दिला. मेळाव्यात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाने अनेक दशके सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आम्ही नेहमीच तुमच्या सेवा आणि विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहोत आणि पुढेही राहू. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.