कार्यकर्त्या मेळाव्यात ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका

कार्यकर्त्या मेळाव्यात ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका

Published on

कार्यकर्त्या मेळाव्यात ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका
रोहा, ता. १३ (बातमीदार) : लोभापोटी शिवसेना सोडून गेलेले काही नेते आज स्वतःच्याच निर्णयावर पश्चात्ताप करत आहेत. त्यांना आता शिवसेनेचे मोल आणि संघटनेची ताकद जाणवू लागली आहे. जे गेलेत ते परतीच्या मार्गावर आहेत, असा गौप्यस्फोट रायगड जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी केला. ते रोहा भाटे सार्वजनिक वाचनालयात आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मेळाव्यात बोलत होते.
शिवसैनिकांना संबोधित करताना भोईर यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटातील नेत्यांवर कठोर शब्दांत टीका केली. भाजपने युतीच्या काळात शिवसेनेचा वापर करून पाठीमागून वार केला. म्हणून उद्धव ठाकरे यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आज सत्ताधारी पक्ष जातीपातीचे राजकारण करून समाजात फूट पाडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने देशाला कर्जाच्या खाईत लोटले आहे. प्रत्येक नागरिकावर हजारो रुपयांचे कर्ज झाले असून, जनतेच्या भविष्याशी खेळ सुरू आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. भोईर यांनी सांगितले की, जे नेते सेनेतून गेले, त्यांनी नवीन पक्षात स्वतःची घुसमट अनुभवली आहे. सेनेला सोडून गेलेल्यांचे फोन जिल्हाप्रमुखांकडे पुन्हा येत आहेत. त्यांना उमजले आहे की शिवसेना संपलेली नाही, उलट निष्ठावान शिवसैनिकांना आता काम करण्याची संधी मिळत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले, तुमची मूठ कोणी बंद केली? ती उघडा ना, काय आहे त्या मुठीत, ते जनतेला कळू द्या. मुठी आवळून विकासकामे होत नाहीत. शिवसैनिकांनी एकजूट ठेवून काम करावे.

Marathi News Esakal
www.esakal.com