थोडक्यात नवी मुंबई
सानपाडा परिसरात रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य
जुईनगर (बातमीदार) ः सानपाडा परिसरातील नागरिक सध्या धुळीच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. पावसाळा संपल्यानंतरही सेक्टर चार ते आठदरम्यान अनेक रस्ते खड्डेमय झाले असून, दुरुस्ती न झाल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज चौक ते बधाई स्वीट्स, सेक्टर पाचमधील गोल्डन पॅलेस परिसर, सेक्टर सात येथील पोलिस चौकी ते मिलेनियम टॉवर आणि सेक्टर आठ येथील नवरत्न सोसायटीसमोरील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे पादचारी, शाळकरी मुले व वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणचे रस्ते ग्रामीण भागातील चिखलमय रस्त्यांप्रमाणे झाले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि उमेदवारांनी या प्रश्नावर तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नागरी कामे बंद झाली, तर आणखी चार महिने या धुळीच्या आणि अस्वच्छतेच्या त्रासात दिवस काढावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने डांबरीकरण आणि स्वच्छतेची कामे हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
.................
वनवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद
तुर्भे (बातमीदार) ः समाजातील वंचित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याचा सुंदर उपक्रम नेरूळ येथील गीत गजानन भजनी मंडळ आणि युथ कौन्सिल नेरूळ या संस्थांनी राबविला. पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील ३९ विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि खाऊचे वाटप करून दिवाळीचा सण गोड आणि संस्मरणीय केला. या उपक्रमात मंडळाच्या प्रमुख शैलजा केळकर यांनी स्वतः घरी बनवलेले लाडू आणि चिवडा विद्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमात संगीततज्ज्ञ अपर्णा दाबके, रेखा वाळवेकर, स्वाती पालकर, तसेच युथ कौन्सिलचे सुभाष हांडे देशमुख, दत्ताराम आंब्रे, दिलीप चिंचोळे, सूर्यकांत गावडे, रवींद्र कांबळे आणि अंकुश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आश्रम परिसरात फणस आणि जांभूळ या फळझाडांचे रोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, देशभक्तीपर गीते, तसेच प्राण्यांचे आवाज सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. मुलांची शिस्त, अभ्यासातील प्रगती आणि आश्रमाचे स्वच्छ वातावरण पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. अखेरीस अपर्णा दाबके यांनी विद्यार्थ्यांना ‘हीच आमुची प्रार्थना’ हे गीत शिकवून सामूहिक सादरीकरण घडवून आणले. या उपक्रमातून समाजातील वंचित मुलांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याचे आणि पर्यावरण संवर्धनाचे दुहेरी उद्दिष्ट साध्य झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
...............
जाणीवपूर्वक वीज खंडित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
नेरूळ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आंदोलनादरम्यान काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी केला आहे. या कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाटील यांनी यासंदर्भात सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले असून, आंदोलनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे अयोग्य आहे. विद्युत पुरवठा खंडित करणे हा जनजीवन विस्कळित करणारा गंभीर गुन्हा आहे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा, विशेषतः रात्रीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन, रुग्णांची काळजी आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात लढा द्यावा; पण सामान्य नागरिकांना त्रास देऊ नये, असे पूनम पाटील यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.