दिवाळीआधी ठाण्यात राजकीय फटाके

दिवाळीआधी ठाण्यात राजकीय फटाके

Published on

दिवाळीआधी ठाण्यात राजकीय फटाके
निदर्शने, मोर्चा, भेटीगाठीने सोमवार गाजला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : दिवाळीच्या आधीच ठाण्यात राजकीय फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा, त्याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाने पालिका मुख्यालयाबाहेर केलेली निदर्शने आणि काँग्रेसने घेतलेली भ्रष्टाचारविरोधात पत्रकार परिषद, त्यानंतर भाजपचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांनी घेतलेली पालिका आयुक्तांची भेट, अशा घटनाक्रमांनी आठवड्याचा पहिला दिवस असलेला सोमवार गाजला. दिवसभर शहरात राजकीय खलबते सुरू असताना सायंकाळी मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काही पक्षप्रवेशही झाले.

मुंबईपाठोपाठ ठाणे महापालिका ही महत्त्वाची मानली जाते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका येथील भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामांमुळे वादात सापडली आहे. ठाणे शहराला भेडसावणारी वाहतूक कोंडी, पाण्याची आणि कचऱ्याची समस्या या आहेतच. त्यात उपायुक्तांच्या लाचखोर प्रकरणामुळे हे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोमात गेलेल्या विरोधी पक्षांना त्यामुळे आयते कोलीत सापडले आहे. ही संधी साधत विरोधक एकवटले असून, त्यांनी सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या मोहिमेचा एल्गार करत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने सोमवारी (ता. १३) ठाण्यात मोर्चा काढला. या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ मिळाल्यामुळे आणि मोठ्या संख्येने ठाणेकरही सहभागी झाल्यामुळे आगामी महापालिका निवडणूक कोणत्या दिशेने जाणार याची झलक पाहायला मिळाली.

दुपारी राम गणेश गडकरीपासून निघालेल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने जमाव सहभागी झाला होता; मात्र त्याआधी सकाळपासूनच ठाण्याचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली होती. तालिबानचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर लगेचच काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचारावर बोट ठेवले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही काँग्रेस मोर्चात सहभागी झाली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडण्याचे काँग्रेसने ठरवल्याचे दिसते. विरोधकांची वज्रमूठ घट्ट होत असल्याचे दिसताच राज्यात सत्तेत असलेल्या आणि महापालिकेवर या आधी सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गट, भाजप लोकप्रतिनिधींनीही अचानक ठाणे पालिका मुख्यालयात हजेरी लावून आयुक्तांशी चर्चा केली. खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी विकासकामे आणि इतर समस्यांसाठी ही भेटगाठ असल्याचे सांगितले, पण मोर्चामुळे सत्ताधारी पक्ष अस्वस्त झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट अलिप्त राहिला आहे; मात्र सायंकाळी धडाक्यात पक्षप्रवेश घेत त्यांनीही आपली हजेरी राजकीय घडामोडींमध्ये लावली आहे.

भाजपचा सावध पवित्रा
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने काढलेल्या मोर्चाबाबत भाजपने सावध भूमिका घेतली आहे. वास्तविक ठाणे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आमदार संजय केळकर यांनी वारंवार विधानसभेतही चर्चा घडवून बोट ठेवले होते. त्याची आठवण करून देत निवडणुकांसाठी आम्ही मोर्चे काढत नसल्याचे सांगितले, पण त्याचवेळी पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले.
संबंधित सविस्तर बातम्या पान क्रमांक तीनवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com