जोगेश्वरीत बांधकामस्थळी मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी
जोगेश्वरीत बांधकामस्थळी मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी
आमदार अमित साटम यांचे पालिका आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : जोगेश्वरी (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामस्थळी झालेल्या दुर्घटनेत २२ वर्षीय संस्कृती अमीन हिचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दुर्घटनेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून अचानक विट खाली पडल्याने संस्कृती अमीन हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून, सुरक्षेच्या नियमांकडे गंभीरपणे दुर्लक्ष झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार साटम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी पालिकेकडे केल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. जर हे खरे असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत, मुंबईतील सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांचे ऑडिट करण्याचे निर्देश पालिकेने द्यावेत, अशीही आमदार साटम यांची मागणी आहे. सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्यास, संबंधित प्रकल्पांवर काम थांबवण्याच्या नोटिसा देऊन योग्य ती दंडात्मक कारवाई करावी, असे त्यांनी पुढे नमूद केले.
मुंबईसारख्या महानगरात रोज शेकडो बांधकामे सुरू असतात. अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे सुरक्षा तपासणीची प्रक्रिया कठोर आणि पारदर्शक असावी, असे आमदार साटम यांनी म्हटले आहे.
...........