शायनिंग होप, शिक्षा की पोटली उपक्रमास सुरुवात
शायनिंग होप, शिक्षा की पोटली उपक्रमास सुरुवात
पालघर, ता.१५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा, प्राणी कल्याण आणि शैक्षणिक प्रोत्साहन या उद्देशाने बी.जी.एम. फाऊंडेशनने नुकतेच आशागड ग्रामपंचायत कार्यालय, येथे "शायनिंग होप" "रिफ्लेक्टिव्ह बेल्ट प्रोजेक्ट" "शिक्षा की पोटली" शालेय बॅग वितरण उपक्रम’ या दोन अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की ही अत्यंत कल्पक आणि गरजेची योजना असून रस्ते अपघातांपासून जीव वाचविण्यासाठी समाज, शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बी.जी.एम. फाऊंडेशनचे आऊटरीच प्रमुख किशोर गजघाटे यांनी प्रास्ताविक केले आणि सांगितले की आजचा दिवस पालघर जिल्ह्यासाठी आणि फाऊंडेशनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते सुरक्षा, प्राण्यांविषयी सहानुभूती आणि शिक्षण ही समाजपरिवर्तनाची तीन प्रमुख साधने असून आज त्यांना स्पर्श करणारे दोन उपक्रम सुरू होत आहेत.
"शायनिंग होप" उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील भटक्या व पाळीव जनावरांना जैवविघटनशील परावर्तक कॉलर बेल्ट लावले जातील, जे वाहनांच्या प्रकाशात चमकून चालकांना दूरून दिसतात, ज्यामुळे अपघात टाळता येतात. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात डहाणू, पालघर, तलासरी आणि वाडा तालुक्यांमध्ये एक हजार जनावरांना बेल्ट लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी ग्रामपंचायत, गौसेवक, पशुवैद्य आणि स्थानिक स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आहे. उद्घाटनात थेट प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना प्रतीकात्मकरीत्या १०० बेल्टचे वितरण करण्यात आले. याचवेळी "शिक्षा की पोटली" उपक्रमाचा शुभारंभ देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्य वितरण करून त्यांना शिक्षणात सातत्य व प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर, अॅडमिन निश्चल मेहता, तालुका पशु संवर्धन अधिकारी संदेश सुकाळे, आशागड पशु संवर्धन अधिकारी रमेश दळवी, उपसरपंच दिल्पेश दौडा, ग्रामपंचायत अधिकारी राहुल पाटिल, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, गौसेवक आनंद मोहिते, रोशन शर्मा, विश्वजित सिंग व इतर गौसेवक तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक पिंपळे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.