पोयनाडमध्ये दिवाळी खरेदीचा उत्साह
पोयनाडमध्ये दिवाळी खरेदीचा उत्साह
रंगीबेरंगी फटाके ठरताहेत बच्चे कंपनीचे आकर्षण
पोयनाड, ता. १५ (बातमीदार) : दिवाळी म्हटले की बच्चे कंपनीसाठी किल्ले बनविणे आणि फटाके वाजविणे हा दरवर्षीचा नित्यक्रम ठरलेला आहे. या दिवाळीसाठी रंगीबेरंगी आणि आकर्षक फटाके पोयनाड बाजारपेठेत आणि पेण-अलिबाग राज्यमार्गालगत पांडवादेवी ते पेझारी या दरम्यान विविध दुकानांमध्ये दाखल झाले आहेत. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने पोयनाड बाजारपेठेत फटाके खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
बच्चे कंपनीचे आकर्षण असलेले पाऊस, फुलबाजे, सुरसुरी, लवंगी, नागगोळी, भुईचक्र, रंगीत प्रकाश करणारे तसेच विविध रोषणाई करणारे फटाके यासाठी विविध दुकानांवर ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. बाजारपेठेची मागणी आणि ग्राहकांचा प्रतिसाद यानुसार फटाके ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोयनाड परिसर आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांना पेण-अलिबाग राज्यमार्गालगत पांडवादेवी ते पेझारी या दरम्यान असलेल्या दुकानांमध्ये सवलतीच्या दरात हे फटाके उपलब्ध होताहेत. फटाके खरेदीवर विविध बक्षीस किंवा लकी ड्रॉ सारखे उपक्रम राबविल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढत आहे. पूर्वी अलिबाग, कार्लेखिंड, पेण, मुंबई येथून फटाके आणावे लागत पण आता पेझारी आणि पोयनाड परिसरात जागोजागी हव्या त्या प्रकारातील फटाके उपलब्ध होवू लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे. तसेच विक्रेत्यांकडून ग्राहकांना फटाके वाजविण्यासोबतच प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असा संदेशदेखील देत आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून ही फटाक्यांची दुकाने ग्राहकांना सेवा देत आहेत.
.......................
चौकट :
- सुरक्षा नियमांचे पालन
फटाके वाजविताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबरच इतरांची देखील काळजी घेण्याचे आणि कोणालाही इजा न होण्याचे आवाहन सामाजिक संघटना आणि दुकानदार करत आहेत. पूर्वी फटाक्यांचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्यात होते. त्यामुळे ते सहज ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत. आता मात्र मनुष्यबळाची कमतरता, वाढलेली महागाई आणि फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या साधनांची कमी उपलब्धता, साठवणुकीची जागा उपलब्ध नसणे, आदी कारणांमुळे फटाक्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
...............
- वाहतूक कोंडीचे आवाहन
पोयनाड बाजारपेठेत सध्या खरेदीसाठी मोठी गर्दी असते; मात्र पेण-अलिबाग राज्यमार्गालगत पेझारी नाक्यावर रस्त्यालगत असलेल्या दुकानांसमोर वाहने पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवतो. यामुळे आधीच रस्त्याला खड्डे पडले असून त्यात धुळीचे साम्राज्य आणि त्यात फटाकाखरेदीला येणाऱ्यांची पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहेत.
.......................
दिवाळीसाठी श्रीवर्धन बाजारपेठ सजली; भारतीय वस्तूंना ग्राहकांचा प्रतिसाद
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर) : दिवाळी अगदी काही दिवसांवर आली असून श्रीवर्धन शहरातील बाजारपेठ खरेदीसाठी गजबजली आहे. बाजारात विविध रंगांचे, आकारांचे आकाशकंदील, डेकोरेटिव्ह पणत्या, रांगोळीचे रंग, घरगुती सजावटीचे साहित्य आणि फटाके विक्रीसाठी आले आहेत. नागरिकांचा कल यंदा ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांकडे वाढलेला दिसून येत आहे.
बाजारपेठेतील दुकाने रंगीबेरंगी पणत्या, विजेवर चालणाऱ्या समया आणि आकर्षक रांगोळी साहित्याने उजळली आहेत. यंदा विशेष आकर्षण ठरत आहेत ते मेणापासून तयार झालेल्या तसेच पाण्यावर तरंगणाऱ्या गुलाब, जास्वंदाच्या आकारातील पणत्या. याशिवाय लाल मातीच्या पारंपरिक पणत्यांचीही मोठी मागणी आहे. रांगोळीचे रंग, पोस्टर रंग आणि साचे विक्रीसाठी उपलब्ध असून, घराघरांत सजावटीसाठी नवीन कल्पक वस्तूंची मागणी वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाणी आळी आणि टिळक रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने उभी राहिली आहेत. फटाक्यांच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या असल्या तरी ग्राहकांचा उत्साह कायम आहे. रंगीत फटाके, टिकली-केपांपासून मोठ्या आतषबाजी फटाक्यांपर्यंत मागणी वाढली आहे, असे विक्रेते सावन तवसाळकर यांनी सांगितले.
..........
चिरांट नामषेश होण्याच्या मार्गावर :
नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरांट नावाचे कडू फळ फोडण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. या कडू फळाच्या रूपात नरकासुराचा प्रतीकात्मक वध करीत कटुता, दुष्टता नाहीशी व्हावी, अशी प्रार्थना केली जाते. जंगल परिसरात वेलींवर उगवणारे चिरांट फळ हे सद्यस्थितीत जंगले उध्वस्त होत असल्याने नामषेश होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.