रायगड पट्टा
रोहा नगराध्यक्षपदासाठी शिल्पा धोत्रे आघाडीवर
रोहा (बातमीदार) ः रोहा अष्टमी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिला (ओबीसी) वर्गासाठी घोषित झाल्यानंतर स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक महिला इच्छुकांचे नावे चर्चेत असली तरी माजी उपनगराध्यक्षा शिल्पा अशोक धोत्रे यांचे नाव सर्वाधिक पुढे आहे. माजी नगराध्यक्ष पूर्वा मोहिते यांच्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. शिल्पा धोत्रे या सर्वसामान्य कुटुंबातून येत असून, समाजातील सर्व घटकांशी उत्तम संवाद साधणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पती अशोक धोत्रे हे राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजीएनटी कक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि वढार समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत. शिल्पा धोत्रे यांना नगरसेवकपदाचा तसेच उपनगराध्यक्ष म्हणून कामाचा अनुभव आहे. धोत्रे दांपत्यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्व धर्मीय समाजात त्यांचा चांगला प्रभाव आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहा महिला दावेदार चर्चेत असून, शिल्पा धोत्रे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
..................
अब्दुल कलाम जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’
कर्जत (बातमीदार) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने कर्जत येथील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयात विशेष उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशु मंदिर शाळेतील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वाचनालयाचे व्यवस्थापक रामदास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. सुट्टीच्या वेळी वृत्तपत्रे, पुस्तके वाचा; यामुळे विचारांची दिशा बदलते आणि ज्ञानवृद्धी होते, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापिका स्मिता निमकर, शिक्षकवर्ग तसेच वाचनालयाचे कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी होते. दुपारच्या सत्रात शिक्षिका सोनाली चव्हाण यांनी ‘वाचन संस्कृती आणि आधुनिक काळातील आव्हाने’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. या निमित्ताने शहरात वाचन संस्कृतीचा संदेश पसरण्यास मदत झाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच लहान वयातच पुस्तकांविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
................
मुरूड-जंजिरा नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान
मुरूड (बातमीदार) : मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अधिक गोड ठरणार आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. नगरपरिषदेत कार्यरत सर्व आस्थापनांवरील कर्मचारी वर्षभर विविध शासकीय योजना, सार्वजनिक सेवा व स्थानिक विकास कामे प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांच्या मेहनतीची दखल घेत मुख्याधिकारी बच्छाव यांनी हा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या कष्टांना सलाम करत, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी हा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाचे नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश आरेकर यांनी स्वागत केले असून प्रशासक बच्छाव यांचे आभार मानले आहेत. या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेतही अधिक वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
..............
इंदापूर विभागात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
माणगाव (वार्ताहर) : महाड विधानसभा मतदारसंघातील माणगाव तालुक्यातील कालवण-इंदापूर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार, व्यायामशाळेचे उद्घाटन, तसेच बौद्ध विहाराचे भूमिपूजन आदी तीन महत्त्वाच्या कामांचा समावेश होता. या सर्व कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या वेळी कालवण परिसर भगव्यामय वातावरणात न्हाऊन निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात, भगवे फेटे बांधून महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कालवण गावाने हा एक ऐतिहासिक सोहळाच साजरा केला.
..................
तळा तालुका पंचायत समिती आरक्षणाने उलटफेर
तळा (बातमीदार) : तळा तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमातींसाठी जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांचे राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार ८५ बोरघर हवेली सर्वसाधारण, ८६ चरई खुर्द सर्वसाधारण महिला, ८७ रहाटाड अनुसूचित जमाती, तर ८८ मांदाड ना. म. प्र. महिला असे आरक्षण ठरविण्यात आले आहे. सभापती पद आरक्षित झाल्याने या पदासाठी स्पर्धा आता अनुसूचित जमाती प्रवर्गापुरती मर्यादित झाली आहे. अनेकांनी याआधी आपल्या मनसुबे आखले असले तरी या निर्णयामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. परिणामी, तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून आगामी सभापती निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.