सेवा पंधरवड्यातून विकासाला गती

सेवा पंधरवड्यातून विकासाला गती

Published on

पालघर, ता. १५ (बातमीदार) : जिल्ह्यामध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात आलेला ‘सेवा पंधरवडा’ हा केवळ उपक्रम नसून, प्रशासनाने नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडविण्याचा विकासाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. या पंधरवड्यात ‘पाणंद रस्ते’, ‘सर्वांसाठी घरे’ आणि ‘नावीन्यपूर्ण उपक्रम’ अशा विविध योजनांची अंमलबजावणी करून पालघर जिल्हा प्रशासनाने जनसहभागातून विकासाचे नवे पर्व सुरू केल्याचा दावा केला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. या वेळी उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई उपस्थित होते.

१७ ते २२ सप्टेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणंद रस्ते मोहिमेत पाच हजार ६९२ रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी चार हजार ५० रस्ते नकाशावर नव्याने शोधण्यात आले, तर ८१ रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. ४८३ रस्त्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून, दोन हजार ८० रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शिवारापर्यंत कायदेशीर, कायमस्वरूपी मार्ग मिळाला असल्याचे प्रतिपादन जाखड यांनी केले.

२३ ते २७ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये २३६ अतिक्रमणे नियमबद्ध करून २.७५७९ हेक्टर क्षेत्र नागरिकांना कायदेशीर मालकीहक्काने देण्यात आले. २३६ घरकुलधारकांना अधिकृत स्वामित्व हक्क मिळाल्याने ‘प्रत्येक कुटुंबासाठी आपले घर’ या स्वप्नाची पूर्तता झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

नागरिकांना सरकारच्या सेवांचा लाभ घरपोच मिळावा, यासाठी ‘सेवादूत’ ॲप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिक अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकतात. मोहिमेदरम्यान एक हजार ९१३ अर्ज प्राप्त असून, त्यापैकी ७६१ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच ६४१ ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ परीक्षण करून उत्कृष्ट केंद्रांना गौरवचिन्हे प्रदान करण्यात आली.

नागरिकांना ऑनलाइन माहिती मिळणार
‘शाळा तिथे दाखला’ उपक्रमअंतर्गत जिल्ह्यातील ६९५ शाळांमध्ये दाखल्यांसाठी शिबिरे घेण्यात आली. एकूण आठ हजार ७३० दाखल्यांपैकी ४९ हजार २१६ दाखले वितरित झाले असून, हे दाखले डिजी लॉकर प्रणालीशी जोडलेले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. जिल्ह्यातील ३४५ दावे मंजूर, तर १३१९ दावे फेरतपासणीसाठी पाठविले. ७५९.५५ हेक्टर क्षेत्रावर बांबूलागवड आणि जीआयएस आधारित पडताळणी करण्यात आली. बुलेट ट्रेन, विरार-डहाणू चौपदरीकरण यांसारख्या प्रकल्पांची माहिती नागरिकांना ऑनलाइन व पारदर्शकपणे मिळणार आहे. जिल्ह्यातील ५० कोळीवाड्यांचे जीआयएस सर्वेक्षण पूर्ण होत असून, सातपाटी गावात प्रायोगिक अंमलबजावणी सुरू आहे. लवकरच सर्व कोळीवाड्यांना डिजिटल मिळकत पत्रिका देण्यात येणार असल्याचे जाखड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com