कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी
भाजप शिंदे गटात शाब्दिक चकमक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर महायुतीत मात्र युतीच्या चर्चांवरून कलगीतुरा रंगला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध शिंदे गट असे वातावरण असताना, आता कल्याण-डोंबिवलीतही तसाच तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादानंतर ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी एका कार्यक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सज्जड दम देत भाजपला ओपन चॅलेंज दिले. ते म्हणाले, की युती होवो अथवा न होवो, आम्ही स्पष्ट सांगतो, याल तर आमच्यासोबत नाही तर आडवे करू. वरिष्ठांचा पक्षाचा आदेश आम्ही पाळू, मात्र कोणाला असे वाटत असेल की युती न करता, काम न करता आम्ही निवडून येऊ, तर आमचं ओपन चॅलेंज आहे. युती व्हायची तेव्हा होईल, पण प्रत्येक पदाधिकारी, शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात धनुष्यबाणावर जागा निवडून आणलीच पाहिजे.
अरविंद मोरे यांच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, की अरविंद मोरे यांनी तरी निदान आडवे पाडण्याची भाषा करू नये. कारण मागच्या निवडणुकीत आमच्या सचिन खेमाणी यांनी त्यांना आडवं पाडलं होतं. प्रसिद्धीसाठी काही राहिले नाही, त्यामुळे ते काही ना काही बोलतात. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यांनी त्याविषयी बोलू नये. युती झाली नाही तरी लढण्याची क्षमता असल्याचे परब यांनी ठणकावून सांगितले. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार आम्ही काम करणार. युती कधी होईल, कोण करेल, काय होईल हे वरचे बघून घेतील. युती नाही झाली तर सर्व ठिकाणी उमेदवार लढण्याची ताकद, कुवत आणि धमक आमच्यात आहे.
भाजपा आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध रंगले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) युतीमधील दोन्ही पक्षांना फटकारले आहे. मनसेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मनोज घरत म्हणाले, की चर्चा आणि फोकस केवळ युती होणार की नाही होणार यावर ठेवण्यासाठी हे वातावरण पेटवत आहेत. गेले २५ ते ३० वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता महापालिकेवर आहे, तरी शहरात परिस्थिती जैसे थे आहे. मनोज घरत यांनी शहराच्या समस्यांचा पाढा वाचला. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत, सर्पदंशाने एका चिमुकलीचा मृत्यू होतो, रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण तसेच आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली तरी खड्डे आहेत. नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या जीवाचे त्यांना काही पडलेले नाही. राजकारणी फक्त युती होणार की नाही, याविषयी झुंजवत आहेत.
जनता जागा दाखवेल
शेवटी त्यांनी युतीच्या भविष्यकाळावर भाष्य केले. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. संपूर्ण मराठी माणूस एकवटलेला आहे. ‘आम्ही हे केले, ते केले’ असे जे कागदी घोडे नाचवतात त्यांना त्यांची जागा या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ही सुज्ञ जनता नक्की दाखवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.