सलग चौथ्या दिवशी बदलापूरकरांचे हाल
सलग चौथ्या दिवशी बदलापूरकरांचे हाल
लोकलची साडेसाती कायम
बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : कामावर वेळेत पोहोचण्यासाठी दररोज सकाळी घाईगडबडीत निघणाऱ्या बदलापूरकरांना आज लोकलमध्ये निदान चढायला तरी मिळेल का, हा प्रश्न सलग चौथ्या दिवशीही सतावत आहे. बुधवारी (ता. १५) सलग चौथ्या दिवशी लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घातला. रविवारी मेगाब्लॉकमुळे सुरू झालेली लोकलची ही साडेसाती सोमवार, मंगळवार आणि आता बुधवार अशा कामाच्या तिन्ही दिवशी कायम राहिली आहे. बदलापूर स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सातत्याने अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत असल्याने बदलापूरकरांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे.
कर्जतहून मुंबईकडे जाणारी आणि बदलापूर स्थानकातून सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी सुटणारी लोकल गेल्या तीन दिवसांपासून ७ वाजून ५० मिनिटांनी दाखल होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल उशिरा येत असल्याने स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळत आहे.
दोन ते तीन लोकलची गर्दी एकाच लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याने प्रवाशांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सलग चार दिवस रेल्वे प्रशासनासमोर हे सर्व घडत असतानाही तांत्रिक अडचणींचे कारण देत रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. बदलापूरकरांची ही साडेसाती संपणार कधी, असा संतप्त सवाल प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे उपस्थित केला, मात्र प्रशासनाकडून समर्पक उत्तर अद्याप मिळालेले नाही.
सलग तीन दिवसांपासून स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात जाऊन प्रवासी जाब विचारत आहेत; मात्र ‘तांत्रिक अडचणी’ हेच एक उत्तर ऐकायला मिळत असल्याने आता प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. या आठवड्यातही परिस्थिती सुधारली नाही, तर बदलापूरकर उग्र आंदोलनाचा बडगा उगारणार असल्याचे स्पष्टपणे रेल्वे प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
लोकल रोज उशिराने येत असल्याने होणारी गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतली आहे. या गर्दीत एखाद्या रेल्वे प्रवाशाचे प्राणदेखील जातील, अशी बदलापूर स्थानकाची स्थिती आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने उपाययोजना कराव्यात.
- मनाली राणे, महिला प्रवासी
रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था लोकल व्यवस्थेची झाली आहे. रोज लोकल उशिरा येत असल्यामुळे लेट मार्क लागून नोकरी गमावण्याची भीती आहे. रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना न सुचवल्यास आम्ही रेल्वे रुळावर उतरून मोठे आंदोलन उभारू.
- सुहास तांबे, रेल्वे प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.