
शिवसेनेच्या इच्छुकांची चाचपणी!
२७ जणांकडून निवडणूक लढवण्याची तयारी
कळंबोली येथे झालेल्या बैठकीत चर्चा
पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः येत्या जानेवारी महिन्यात महापालिकांची निवडणूक होण्याची शक्यात आहे. त्या अनुषंगाने विविध पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनासुद्धा मागे राहिलेली नाही. यासंदर्भात कळंबोली येथे बैठक बोलावून चाचपणी करण्यात आली. जवळपास २७ जणांनी महापालिका निवडणूक लढवण्याबाबत तयारी दर्शविली. त्याचबरोबर पूर्ण क्षमतेने रिंगणात उतरण्याबाबतही निर्धार बोलून दाखवण्यात आला.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यात आलेली आहे. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न केले. जिल्हाप्रमुखांचे होम ग्राउंड असलेल्या कळंबोली शहरामध्ये पक्षाची ताकद जास्त आहे. त्याचबरोबर कामोठे, खांदा कॉलनी आणि खारघरमध्येही शिवसेनेने आपला जम बसवलेला आहे. या ठिकाणचे शहरप्रमुखसुद्धा ॲक्टिव्ह मोडवर आहेत. सभासद त्याचबरोबर शिवदूत नोंदणी करण्यात आलेली आहे. विविध प्रश्नांवर शिवसेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. लोकसभा, विधानसभा, शिक्षक विधान परिषद या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित मैदानात उतरल्याचे दिसून आले. मात्र आगामी महापालिकेमध्ये दोन्ही पक्षांची युती होईल का, याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर किती प्रतिनिधित्व द्यायचे याबाबतही वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी आढावा बैठक बोलावली होती. पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेण्यात आले. निवडणूक लढवण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत त्यांची यादीसुद्धा तयार करण्यात आली. तसेच विविध प्रभागांतून जवळपास २७ जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
...............
चौकट
महायुतीकडेच कल!
पनवेल महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत लढावी, अशा प्रकारची इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र मित्रपक्षाने आपल्याला सन्मानपूर्वक जागा सोडल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही बैठकीत अनेकांनी बोलून दाखवली. तसेच पालिका निवडणुकीसंदर्भात एकूण २० प्रभागांंबाबतचा आढावा घेऊन त्यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोबर युतीबाबत खासदार समन्वय साधणार असल्याचेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
...............
कोट
विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी महापालिका क्षेत्रातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आगामी पालिका निवडणुकीबाबतही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. युती होणार की नाही, हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु या निवडणुकीला शिवसेना सज्ज आहे. तयारी करण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे.
- रामदास शेवाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.