प्रवेश नाकारणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई
सकाळ इम्पॅक्ट
---
प्रवेश नाकारणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई
आयुष संचालनालयाने नेमली समिती; मुलींना प्रवेश नाकारणे महागात
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः मुलींना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण मोफत देण्यात आडकाठी आणणाऱ्या खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. आयुष्य संचालनालयाने राज्यातील सहा महाविद्यालयांची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ही समिती संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांत मुलींना तसेच राखीव घटकातील मुलांना प्रवेशादरम्यान शुल्कासाठी केलेल्या अडवणुकीची माहिती घेऊन संचालनालयाकडे अहवाल सादर करणार आहे.
राज्यातील खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुलींना शुल्क भरण्यासाठी तगादा लावून त्यांची अडवणूक केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने १८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्याची गंभीर दखल घेत मुलींची शिक्षणासाठी अडवणूक करणाऱ्या सहा महाविद्यालयांची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली आहे. त्यात वैद्य प्रशांत दळवी, संदीप काळे, मनोज गायकवाड, राजीव टारपे, श. वि. सूर्यवंशी आणि मिलिंद कांबळे यांचा समावेश आहे. ही समिती मुंबईतील के. जी. मित्तल आयुर्वेद महाविद्यालय, तिब्बिया युनानी वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील झेडव्हीएम युनानी वैद्यकीय महाविद्यालय, न्यू लाइफ आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक जिल्ह्यातील मोहम्मदिया तिब्बिया युनानी महाविद्यालय आणि मालेगाव येथील एएमएस आयुर्वेद महाविद्यालय यांना प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल सादर करणार आहे.
---
शुल्काची माहिती संकेतस्थळावर
आयुष्य संचालनालयाने नेमलेल्या समितीनंतर वैद्यकीय प्रवेशासाठी मुलींना मोफत शिक्षण तसेच विविध राखीव घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क प्राधिकरणाने निश्चित केलेले अनुदानित तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील शुल्कासह प्रवेशासंदर्भात प्राधिकरण आणि राज्य सीईटी सेलने दिलेल्या सूचनाही विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
---
राज्यात सर्व मुलींना वैद्यकीय शिक्षण मोफत आहे. त्याची काही संस्थांकडून अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी समिती नेमली आहे.
- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
---
राज्यातील खासगी महाविद्यालयांकडून मुलींची अवाजवी शुल्कापोटी अडवणूक केली जात होती. याबाबत आलेल्या तक्रारींवर विभागाकडून चौकशी समिती गठित केली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
- अब्दुल रहेमान, सचिव, मिशन अवेअरनेस फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.