गुरूवार बातम्या रायगड
रोह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
रोहा, ता.१५ (बातमीदार) : रोहा शहर व ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या परतीच्या पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शहरात अंधार पसरला आणि त्यानंतर मुसळधार पावसासह वाऱ्यांनी जोरदार कहर केला. यामुळे व्यापारी आणि नागरिक दोघांचीही एकच धांदल उडाली.
दिवाळीचा बाजार तेजीत असतानाच आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेतील फटाक्यांची दुकाने, सजावटीचे साहित्य, शुभेच्छा बॅनर्स, आणि फुलांची दुकाने यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी तंबू व स्टॉल उडाले, तर काही ठिकाणी होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळली. वाऱ्याच्या तडाख्यामुळे विजेचे खांब झुकले व काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. रोहे शहरासह चणेरा, धाटाव, कोलाड, नागोठणे, भालगाव आणि चनेरा या परिसरातही दमदार पाऊस झाला. शहरातील नाल्यांमध्ये पाणी साचल्याने काही भागात वाहतुकीवर परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी दुकाने, शेडखाली किंवा घरांकडे धाव घेतली. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या पावसाने बाजारपेठेतील उलाढाल थंडावली असली तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काही प्रमाणात दिलासा देणारा ठरू शकतो, असे बोलले गेले. मात्र, वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
...............
गोरेगावात धम्मचक्र प्रवर्तन दिनास वर्षावास उत्साहात
माणगाव (वार्ताहर) : संबोधी बुद्ध विहार, गोरेगाव येथे मंगळवार, ता. १४ ऑक्टोबर रोजी पंचशील बौद्धजन सेवा संघ (३२ गाव), मुंबई प्रदेश बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.८४१ व पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिन, वर्षावास प्रवचन मालिका समारोप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पुज्य भदन्त शांतीबोधी, भदन्त डॉ. मैत्रियघोष आयुपाल महाथेरो, उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विकासद शंकरराव गायकवाड होते. कार्यक्रमात भदन्त शांतीबोधी यांनी धम्म संस्कार वाणीद्वारे उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर भदन्त डॉ. मैत्रियघोष आयुपाल महाथेरो यांनी धम्म देसना दिली. या प्रसंगी लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ. चंद्रकुमार बडोले, डॉ. महेंद्र शिर्के, तेजस आढाव, सामाजिक कार्यकर्ते सदानंद येलवे, सूर्यकांत कासे, गौतम जाधव, विश्वास गायकवाड, शिक्षक राजू मोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांपैकी रिना रवींद्र लोखंडे (९२ टक्के), रुपेश गमरे, तनिष्क हाटे यांचाही गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बुद्ध-आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महिला मंडळ सदस्य आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
............
कोरस कामगारांची दिवाळी गोड
रोहा (बातमीदार) : कोरस कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या हक्काच्या पगार आणि बोनससाठी दिलेला लढा यशस्वी केला आहे. कंपनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार बोनस, एलटी बोनस आणि पगार कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आला असून त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळी सात वाजल्यापासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. हक्काचे पैसे मिळेपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असे कामगारांनी स्पष्ट केले होते. या शांततेच्या लढ्यात कंपनीचे एचआर मॅनेजर पावले यांनी चर्चेदरम्यान कामगारांना त्याच दिवशी पगार आणि एलटी बोनस तर पुढील दिवशी बोनस जमा केला जाईल, असे सांगितले. कामगारांनी या निर्णयावर सहमती दर्शवली आणि पुन्हा कामावर रुजू झाले. प्रशासनाने शब्द पाळत बोनस दिल्याने सुमारे दीडशे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कामगार प्रतिनिधींच्या एकजुटीमुळे आणि शांततामय पद्धतीने झालेल्या या आंदोलनाने एक आदर्श निर्माण केला आहे. ....................
ऐतिहासिक सुरगडावर संवर्धन मोहिमेतून स्वच्छतेचा संदेश
रोहा (बातमीदार) : स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या वतीने ऐतिहासिक सुरगडावर ३९वी अखंड गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यानंतर गडावर वाढलेल्या गवत, काटेरी झुडपे आणि कचरा यामुळे पर्यटकांना अडचण निर्माण होत होती. या मोहिमेत शिलेदारांनी एकत्र येऊन गडाच्या वाटा मोकळ्या केल्या. अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत पाण्याच्या टाक्याजवळील परिसर, गडावरील वास्तू, आणि दारूच्या बाटल्यांसह विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. २४ पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. गडावर वाढलेल्या गवतामुळे वास्तू झाकल्या जातात, त्यांना पुन्हा उजेडात आणण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले. या मोहिमेत स्वप्नील विचारे, महेश कीर्दत, अजित दहिंबेकर, रोशन आणि ललित जाधव, योगेश गुजर, शुभम पवार यांसह अनेक युवकांनी सहभाग घेतला. ‘एक दिवस माझ्या राजाच्या गडासाठी’ या घोषवाक्याखाली ही मोहीम पार पडली. संवर्धन मोहिमेतून तरुणांना इतिहासाची जाणीव आणि निसर्ग रक्षणाचा संदेश मिळाल्याने गड परिसरात समाधानाचे वातावरण होते.
..................
खोपोलीत तोतया पोलिसांकडून सोनसाखळीची चोरी
खालापूर (बातमीदार) : खोपोली शहरात दोन तोतया पोलिसांनी एका नागरिकाची पावणेदोन लाख रुपयांची सोनसाखळी व अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी (ता.१४) सकाळी आठच्या सुमारास शास्त्रीनगर येथील आयन इंटरनेट शॉपसमोर दोन अनोळखी इसमांनी पोलिस असल्याचे भासवले. त्यांनी फिर्यादीला चौकशीच्या बहाण्याने थांबवून त्याचे सोन्याचे दागिने कागदी पुडीत ठेवण्यास सांगितले. नंतर त्यांनी चलाखीने पुडी बदलून सोन्याऐवजी स्टीलच्या अंगठ्या व तांब्याची अंगठी ठेवली आणि पसार झाले. घटनेनंतर फिर्यादीने खोपोली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोसई अभिजित व्हरांबळे अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने अशा घटनांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
.....................
लोखंडे विद्यामंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात
मुरूड (बातमीदार) : माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पीटसई येथील अशोक एल. लोखंडे विद्यामंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अरुण खुळपे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुखदेव सवई यांनी डॉ. कलाम यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी पद्धतीने सादर केले. त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि स्वप्नांच्या दिशेने झेप घेण्याचा संदेश दिला. मुख्याध्यापक खुळपे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले. वाचनामुळे मन एकाग्र होते, विचारशक्ती वाढते आणि जीवन यशस्वी होते, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नियमितपणे पुस्तक वाचणाऱ्या नैतिक ज्ञानेश्वर महाजन या विद्यार्थ्याची सर्वोत्कृष्ट वाचक म्हणून निवड करण्यात आली व त्याला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक अकील मुलाणी, दीपक भोसले, संजय ठमके, सुप्रिया रेडीज, संदीप इंगवले आदी उपस्थित होते. वातावरण प्रेरणादायी आणि उत्साही होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.