आर्टिफिशियल फुलांचा रंग गडद; खऱ्या फुलबाजारात मरगळ
शेतकरी, व्यापाऱ्यांना कृत्रिम फुलांचा फटका
दादर बाजारात झेंडू, शेवंतीचे दर अर्ध्यावर
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दिवाळीच्या तोंडावर दादर फुलबाजारात नेहमीच पहाटेपासून गजबज असते. टोपल्यांतून ठेवलेल्या झेंडू, शेवंती, मोगऱ्याचा दरवळ संपूर्ण बाजारभर पसरलेला असतो; पण यंदा ते दृश्य काहीसे फिके पडले आहे. बाजारातील गर्दीला नेहमीसारखा उत्साह नाही. कारण कृत्रिम फुलांना मागणी वाढली असून रंगीबेरंगी प्लास्टिक आणि सॅटिनच्या फुलांच्या माळांनी बाजारातील खऱ्या फुलांची मागणी कमी केली आहे. पारंपरिक फुलबाजारातील व्यापारी आणि पर्यायाने शेतकऱ्यांना या कृत्रिम फुलांच्या वाढत्या विक्रीमुळे मोठा फटका बसला आहे.
गेल्या वर्षी झेंडूचा दर किलोला १५० ते २०० रुपये होता. तो यंदा १०० रुपये इतका खाली आला आहे. शेवंतीचे भाव ४००वरून २०० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. मोगरा आणि गुलाबाच्या किमतीतही किंचित घट झाली आहे. फुलांची आवक नेहमीप्रमाणे असूनही मागणी कमी झाल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते. पूर्वी ग्राहक पाच ते १० किलो झेंडू घेऊन जायचा. आता तो फक्त एक ते दोन किलोवर थांबतो. खर्च वाचवण्यासाठी लोक आर्टिफिशियल फुलांकडे वळत आहेत, असे दादर फुलबाजारातील व्यापारी सांगतात. त्यांच्या मते, खऱ्या फुलांची शोभा आणि सुगंध काही वेगळाच असतो; पण आता लोक टिकाऊ, धुण्यायोग्य आणि परत वापरता येणाऱ्या वस्तूंकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे आमच्या विक्रीवर थेट परिणाम झाला आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो आहे. उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरले.
हवामान आणि बाजार दोन्हींचा ताण सहन करणाऱ्या फुलशेती करणाऱ्यांसाठी दिवाळीचा हंगाम सर्वांत महत्त्वाचा असतो. नाशिक, पुणे, सांगली आणि साताऱ्यातील शेतकरी महिनोन्महिने मेहनत करून ही फुले तयार करतात. मात्र ग्राहकांचा कल बदलल्याने त्यांना खर्चही परत मिळवणे कठीण झाले आहे. काही शेतकरी तर पुढच्या हंगामात फुलशेतीऐवजी इतर पिकांकडे वळण्याचा विचार करीत असल्याचेही समजते.
...
कृत्रिम फुलांची चलती
बाजारात कृत्रिम फुलांच्या दुकानांनी जोर धरला आहे. ही फुले दिसायला आकर्षक, टिकाऊ आणि स्वच्छ ठेवण्यास सोपी असल्याने लोक त्यांच्याकडे झुकत आहेत. ‘एकदाच घेतली की वर्षभर वापरता येतात,’ असे सांगत ग्राहक रंगीबेरंगी माळा सहजपणे खरेदी करताना दिसतात. या फुलांच्या माळा २०० ते ८०० रुपयांदरम्यान विकल्या जात आहेत. खऱ्या फुलांचा सुगंध, मातीचा वास आणि हातावर चिकटणारी पाकळी ही मुंबईच्या दिवाळीची ओळख होती; पण यंदा त्या नैसर्गिक गंधाला कृत्रिम फुलांच्या सुगंधरहित रंगांनी मागे टाकले आहे. फुलबाजार अजूनही गजबजलेला आहे; पण तो गंध, ते चैतन्य आणि ती अस्सल ऊब यंदा कुठेतरी हरवलेली जाणवते.
...
दादर बाजारात फुलांचे दर (रुपये किलो)
फुलांचा प्रकार - गेल्या वर्षीचा दर - यंदाचा दर
झेंडू - १५० ते २०० - १००
शेवंती ४०० - २००
मोगरा ८०० - ७००
गुलाब ३०० - २५०
...
गेल्या १५ वर्षांपासून मी दादर फुलबाजारात व्यापार करतो. मी स्वतः शेतकरी आहे आणि जुन्नरमध्ये दोन एकर जमिनीवर झेंडू आणि शेवंतीची लागवड केली आहे. पूर्वी दिवाळीचा हंगाम आला की बाजारात फुलांचा ओघ वाढायचा, चांगला नफा मिळायचा; पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कृत्रिम फुलांमुळे आमच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. फुलांची लागवड, तोडणी, वाहतूक आणि बाजारात आणण्याचा खर्च इतका वाढला आहे, की तो वसूलही होत नाही. मेहनतीचे चीज न होणे हे सर्वांत जास्त त्रासदायक आहे.
- सुमित गायकवाड, व्यापारी आणि शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.