स्वकर्तृत्वाने नारीशक्तीची झेप
वसई, ता. १८ (बातमीदार) ः आजच्या युगात महिला केवळ नोकरी नव्हे, तर व्यवसाय क्षेत्रातदेखील भरारी घेत आहेत. वसई-विरार शहरात अनेक महिला स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. त्यांना महापालिकेकडून प्रोत्साहन दिले जात असून तृतीयपंथीदेखील सन्मानाने पर्यावरणपूरकतेची हाक देत व्यवसाय करत आहेत, हे विशेष म्हणावे लागेल. दिवाळीत नारीशक्ती स्वकर्तृत्वाने अर्थार्जनाचा गोडवा मिळवत आहेत.
दिवाळीसाठी नागरिक एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतील, यासाठी बाजारपेठेत फिरत असतात. असाच उपक्रम महापालिकेने महिला बचत गटांच्या माध्यमातून दिवाळीत उभारला आहे. वसई-विरार महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामार्फत दीपावलीनिमित्त विशेष बाजारपेठांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगारासाठी संधी मिळाली आहे. विविध भागात असलेल्या स्टॉलमध्ये करंजी, चकली, चिवडा, बेसन लाडू यासह अन्य फराळ, विविध रंगांच्या नक्षीदार पणत्या, कोल्हापुरी साड्या, कृत्रिम फुले, हार, रांगोळी, आकाश कंदील, चादर, तसेच तृतीयपंथी बचत गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्यांची सुरेख सजावट विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, शहर व्यवस्थापक रूपाली कदम व समुदाय संघटक प्रेमसागर इगवे यांनी भेट देत महिला, तसेच तृतीयपंथी बचत गटाला प्रोत्साहन दिले. महिलांना छोटे-मोठे उद्योग प्राप्त होऊ लागले आहेत, तर गणेशोत्सव, स्वातंत्र्यदिन, नवरात्रोत्सव, दिवाळीतून व्यवसायाची संधी मिळू लागली आहे. ऑनलाइनदेखील व्यवसाय वृद्धिंगत होऊ लागला आहे. व्यवसायाला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने दिवाळीचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे.
पर्यावरणाला बाधक असणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर होऊ नये, यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात नक्षीदार आकर्षक कापडी पिशव्या केल्या असून व्यवसायाचे व्यासपीठ महापालिकेने उपलब्ध करून दिले. तृतीयपंथींना सन्मान मिळत आहे.
- रुबी मल्ली, महिला बचत गट
घरगुती फराळाचे स्टॉल उपलब्ध असल्याने त्याचा फायदा होत आहे. व्यवसायातून कमाईचे साधन प्राप्त करून गरिबीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- निर्मला जाधव, जय जीवदानी स्वयंसहाय्य्यता महिला बचत गट
घरगुती फराळासह महिलांनी तयार केलेले सुरेख तोरण व विविध वस्तू या उपलब्ध आहेत. सणासुदीला लागणाऱ्या वस्तू आम्ही तयार करतो. बचत गटातील महिलांमध्ये आनंद आहे.
- स्नेहल सावंत, सचिव, श्री साई महिला बचत गट, विरार
बचत गटातील उद्योजिकांचे प्रोत्साहन वाढावे, त्यांना भविष्यात अधिक क्षमतेने पुढे जाण्याचे बळ मिळावे, यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच दिवाळीला स्टॉल महापालिकेने दिले आहेत. नागरिकांनी बाजारपेठांना आवर्जून भेट देऊन खरेदी करावी.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.