रोषणाईने उजळली पनवेलनगरी
रोषणाईने उजळली पनवेलनगरी
बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह, कोट्यवधींची उलाढाल
पनवेल, ता. १९ (बातमीदार) : दीपोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पारंपरिक उत्साहात धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. बाजारपेठांत सायंकाळनंतर सहकुटुंब खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असून, पनवेल परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांमुळे चैतन्य पसरले आहे.
दिवाळीतील लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेसाठी नागरिकांनी खरेदीचे नियोजन सुरू झाले आहे. कपडे, दागिने, वाहन, फटाके, गृहोपयोगी वस्तू, स्मार्टफोन, लॅपटॉप यांची खरेदी सुरू आहे. अनेकांनी नव्या घरांच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे. खरेदीचा उत्साह वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांनी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. वाहन खरेदीवर पाच टक्के रोख परतावा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर शून्य टक्के व्याज तसेच दागिन्यांच्या मजुरीवर १० ते १५ टक्क्यांपर्यंत सवलतींमुळे पनवेलसह प्रमुख शहरातील बाजारपेठांमध्ये गजबजली होती.
----------------------------
रात्री उशिरापर्यंत लगबग
- दिवाळीनिमित्त कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्टफोन, दागिने क्षेत्रांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. शोरूम आणि दुकानांनी आकर्षक विद्युत सजावट, रोषणाई ग्राहकांना खुणावत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ राहिली.
- मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. दीपोत्सवाला सुरुवात झाली असली, तरी मुख्य पर्वाच्या तयारीत शहरातील रस्ते वाहनांनी फुलले आहेत. गर्दीतून वाहन काढताना अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियोजन नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
---------------------
पूजा साहित्याला मागणी
लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती, पणत्या, झाडू, रांगोळी छापे, शुभ-लाभ फलक, लाल कापड, चौरंग, पाठ, रांगोळी साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी उसळली. दरवर्षीप्रमाणे पूजा साहित्यातून यंदा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे.
---------------------------------
झेंडूच्या भावात उसळी
लक्ष्मीपूजन, पाडव्यासाठी झेंडू, शेवंतीसह विविध फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील फुल बाजार झेंडूच्या सुगंधाने नटला आहे. झेंडूच्या भावात उसळी आली असून, ४० ते ५० रुपये भाव असलेला आता शंभर रुपयांवर गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.