वाळीत भाजप - शिंदे सेनेमध्ये दिव्यामध्ये वाजणार शाब्दिक फटाके
दिवाळीत वाजणार शाब्दिक फटाके
भाजपने दिव्यात लावलेल्या फलकातून थेट शिंदे सेनेवर साधला निशाणा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : दिवा शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या सत्ताधारी पक्षामधील वादविवाद हा काही नवीन नाही. त्यातच आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपला दिव्यात खाते उघडायचं आहे. यानुसार भाजपने दिव्यात लावलेले फलक आता चर्चेचा विषय बनला आहे. या फलकावर आता वेळ आली आहे, या कार्यसम्राटांना फाटकी शॉल आणि नासलेले श्रीफळ देऊन घरी बसवण्याची, अशा आशयाद्वारे थेट शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही पक्षांत दिवाळीत शाब्दिक फटाके वाजण्याची दाट शक्यता आहे, मात्र शिंदे सेनेचे दिवा शहराध्यक्ष रमाकांत मढवी यांनी याबाबत बोलणे स्पष्ट टाळले आहे. त्यामुळे शिंदे सेनेने तलवार उपसण्यापूर्वीच म्यान करून ठेवली की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
दिवा जंक्शनपेक्षा डम्पिंग ग्राउंड आणि अनधिकृत बांधकामामुळे नावरूपास आले आहे. या शहरातून आठ नगरसेवक महापालिकेवर निवडून जातात. आतापर्यंत शिवसेना आणि मनसे या पक्षाचे नगरसेवक महापालिका सभागृहात दाखल झालेले आहेत, मात्र भाजपला दिव्यात अद्यापही खाते उघडता आले नाही. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाचे दिव्यात वर्चस्व राहिले आहे. आठपैकी सात नगरसेवक हे शिंदे गटाचे होते. या दिवाळीनिमित्त भाजपने एक फलक लावून शिंदे सेनेवर थेट निशाणा साधला आहे. दरम्यान, ते फलक भाजप दिवा शहरने लावल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्याशिवाय शिंदे सेना आता भाजपला कसे उत्तर देते, हेच पाहावे लागणार आहे.
मतदान बदला दिवा नक्कीच बदलेल
त्या फलकावर भाजपने आली दिवाळी, पण आठवणीत आहे दिवेकरांना चार वर्षांपूर्वीची काळी दिवाळी! असे शीर्षक दिले आहे. त्याच्याखाली दिवेकरांनो विकासाच्या नावावर दिवाळीच्या तोंडावर बेघर केलेल्या लोकांना चार वर्षे पूर्ण होत आहेत. लोकांना बेघर करून फेरीवाले बसवले, एका संस्थेने तिथे सार्वजनिक शौचालय उभारले! हाच होता का तो कार्यसम्राटांचा विकास, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर आता वेळ आली आहे या कार्यसम्राटांना फाटकी शॉल व नासलेले श्रीफळ देऊन घरी बसवण्याची असे नमूद करताना, दोन फोटो लावून मतदान बदला दिवा नक्कीच बदलेल, असे भावनिक आवाहन भाजपने मतदारांना केले आहे.
विकासाच्या नावाखाली दिवेकरांना बेघर केले आहे, मात्र विकास न करता, तेथे फेरीवाले बसून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे आता काम सुरू आहे. याशिवाय त्या जागी खासगी संस्थेच्या माध्यमातून शौचालय उभे केले आहे. ज्या उड्डाणपुलासाठी नागरिकांना बेघर केले, ते उड्डाणपूल कधी पूर्ण होणार आणि ते नेमकं कुठे उतरणार हेच समजत नाही, तर नागरिकांना बेघर करणे हा विकास आहे का?
- सचिन भोईर, दिवा शहर अध्यक्ष, भाजप.