व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत

व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत

Published on

व्याधीमुक्त होण्यासाठी ऑक्सिजन पार्कची मदत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : रस्त्यावरून या उद्यानाच्या आत आल्यावर आपल्याला हवेतील फरक स्पष्टपणे जाणवतो. येथील औषधी वनस्पतींचे गुणधर्म ऐकल्यावर व्याधीमुक्त होण्यासाठी या उद्यानाची सैर आवश्यक असल्याचे लक्षात येते. व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाण्यात विविध संकल्पनांवर आधारित उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. त्यापैकीच एक राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजेच ऑक्सिजन पार्कचे सोमवारी (ता. २०) लोकार्पण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. लोकार्पण केल्यावर सर्व मान्यवरांनी या उद्यानातील सुविधांची पाहणी केली.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नागरिकांनीही याची जाणीव ठेवली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले. ठाणे शहर बदलतेय. डिसेंबरपर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल. रस्ते रुंद होत आहेत, रिंग मेट्रोचे काम सुरू झाले आहे. ठाण्यात कावेसर, लोकमान्य नगर, नागला बंदर अशा ठिकाणी अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत दोन लाख नऊ हजार झाडे लावण्यात आली आहेत. मुक्त मार्ग, भुयारी मार्ग या प्रकल्पांमुळे विकसित ठाणे, हरित ठाणे अशी शहराची ओळख निर्माण होत आहे, असेही शिंदे म्हणाले. महापालिकेच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. तसेच या उद्यानाच्या कामबद्दल उद्यान अधीक्षक केदार पाटील यांचे एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केले.

उद्यानाविषयी माहिती
ठाणे पालिका वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत हिरानंदानी मेडोज परिसरात साडेतीन एकर क्षेत्रफळात राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात दुर्मिळ वृक्ष आणि औषधी वनस्पती व शोभिवंत फुलझाडांची लागवड केलेली आहे. यासह धन्वंतरी आणि आयुर्वेदाचे जनक आचार्य चरक व आचार्य सुश्रुत यांचेही शिल्प उभारले आहे. या ठिकाणी कृत्रिम तलावदेखील साकारला असून, यात विविध पानवनस्पतींची लागवड केलेली आहे. येथील बहुतांश झाडांना क्यूआर कोडसह माहिती फलक लावले आहेत. पक्ष्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने विद्युत दिव्यांची सोयही केलेली आहे. या उद्यानात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मितीकरिता ५०० हून अधिक बांबूची लागवड केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com