दिवाळीत आगीच्या घटनांचा धूर

दिवाळीत आगीच्या घटनांचा धूर

Published on

दिवाळीत आगीच्या घटनांचा धूर
चार दिवसात तब्बल २५ घटनांची नोंदः गतवर्षापेक्षा आठने घट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ ः गेल्या नऊ वर्षांप्रमाणे यंदाही दिवाळीला आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. दहा वर्षात दिवाळीमधील आगीच्या घटनांची सरासरी ही ३१ इतकी असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये तब्बल आठने घट झालेली आहे. दिवाळीच्या पहिल्या चार दिवसात फटाक्यांमुळे किंवा इतर कारणास्तव तब्बल २५ आगीच्या घटनांची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात नोंद झालेली आहे.
दिवाळीत ठाणे शहरात मागील दहा वर्षात तब्बल ३०६ आगीच्या घटनांची नोंद झालेली आहे. यामध्ये २०१८ साली तर आगीच्या घटनांनी अर्धशतक गाठले होते. या दहा वर्षात सर्वाधिक ५३ आगीच्या घटना २०१८ मध्ये नोंदवल्या गेल्या होत्या. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षात ५१ आगीच्या घटनांची नोंद झाली होती. तर २०१९ आणि २०२० या वर्षात आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. या दोन वर्षात एकूण ३७ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र, कोरोनानंतर शिथिलता मिळाल्याने २०२१ या वर्षी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. त्या वर्षी तब्बल ३३ ठिकाणी आगी लागल्याचे कॉल आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर २०२२ वर्षी दिवाळीत आगीच्या घटनांमध्ये चारने घट झाली असून तो आकडा २९ वर आला आहे. पण, २०२३ वर्षी दिवाळीत तब्बल ४७ घटनांची नोंद झालेली आहे.

किरकोळ आगीच्या घटना
यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही दिवाळी जोरदार साजरी होत असली तरी आगीच्या घटनांमध्ये गतवर्षापेक्षा यंदा प्रखरतेने घट झाल्याचे दिसत आहे. या घटनांमध्ये आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये फटाक्यांमुळे आणि इतर कारणाने कचऱ्याला, ताडपत्री, नव्या बांधकाम सुरू असलेल्या जाळी याच्यासह दुचाकी, चारचाकी गाड्यांना आणि मीटर बॉक्सला आग लागली आहे. तर, दुसरीकडे सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

अशा आहेत २५ आगीच्या घटना
२० ऑक्टोबरला (नरक चतुर्दशीला) पाच आगीच्या घटनांची नोंद झाली होती. दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती संख्या चार आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याला सहा झाली. चौथ्या दिवशीही म्हणजे भाऊबीजेला आगीच्या घटनांचा आकडा १० झाल्याची माहिती आपत्ती कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com