भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Published on

विरार, ता. २५ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याची आक्षेपार्ह चित्रफीत तयार करून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यकर्ते तडीपार असून ते सर्रास शहरात वावरत आहेत.

किरण बनसोडे (वय ३५) हे नालासोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. २६ सप्टेंबरला फेसबुकवर त्यांची एक आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. ते रस्त्याच्या कडेला लघुशंका करीत असताना चोरून ही चित्रफीत काढण्यात आली होती. त्यावर असभ्य भाषेत बदनामीकारक मजकूर लिहून ती पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. भाजपचे कार्यकर्ते ऋतिक पोळ आणि प्रीतेश पवार यांनी ही चित्रफीत काढून ती समाजमाध्यमांवर पोस्ट केली होती. त्यांच्याविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. तरीदेखील ते सर्रास शहरामध्ये खुले आम वावरत आहेत. बनसोडे यांना या प्रकारामुळे मानसिक त्रास झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोघांविरोधात तक्रारी दिल्यामुळे त्यांची तडीपारी झाली होती. त्यामुळे बदला घेण्यासाठी त्यांनी ही चित्रफीत तयार केली आणि माझी समाजात बदनामी केली, असे बनसोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

ऋतिक पोळ आणि प्रीतेश पवार हे दोन्ही आरोपी तडीपार आहेत. त्यांनी किरण बनसोडे यांची बदनामी करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com