लाखभर पर्यटक मुक्कामी
लाखभर पर्यटक मुक्कामी
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर सुट्ट्यांमुळे गर्दी
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) ः दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मुरूड या समुद्रकिनाऱ्यांसह माथेरान, किल्ले रायगड येथे चार दिवसांत सुमारे लाखभर पर्यटक मुक्कामी आहेत.
दिवाळीचे चार दिवस उत्साहात पार पडल्यानंतर शुक्रवारपासूनच पर्यटकांनी जिल्ह्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सकाळी उष्मा आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यास पसंती दिली आहे. अलिबाग, नागाव, रेवदंडा, मुरूड, किहीम, मांडवा, हरिहरेश्वर, दिवेआगार, श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यापासून काही प्रमाणात ठप्प झालेला पर्यटन व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली आहे. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने जलवाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक जण रस्ते वाहतुकीला पसंती देत आहेत; पण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने होत आहे.
-----------------------------
या मार्गांवर कोंडीचे विघ्न
अलिबाग-वडखळ रस्ता, पोयनाड, पेझारी नाका, अलिबाग-नागाव रस्ता, कुरूळ बायपास येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात आहेत. तसेच बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यात येत आहे.
----------------------------
सीएनजी पंपावर गर्दी
गेल्या काही वर्षांपासून डिझेल किंवा पेट्रोलची चारचाकीपेक्षा सीएनजीच्या चारचाकींना ग्राहकांची पसंती मिळत आहे. जिल्ह्यात दाखल झालेले अनेक पर्यटक आपल्या चारचाकीने आले आहेत. त्यामुळे सीएनजी पंपांवर वाहनांची गर्दी झाली होती.
---------------------------
व्यावसायिकांना दिलासा
पावसाळ्याच्या दिवसांत किनारे ओस पडले होते. त्यामुळे किनाऱ्यांवरील छोटी-मोठी दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांना उदरनिर्वाहसाठी व्यवसाय काही प्रमाणात ठप्प झाला होता. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी केल्याने खाण्याची दुकाने, घोडागाडीवाले, जलक्रीडा व्यावसायिकांच्या व्यवसायाला उभारी आली आहे. किनाऱ्यांवर उंट सफारी, घोडागाडीचा पुरेपूर आनंद पर्यटक घेत आहेत. सकाळच्या वेळी उष्मा जाणवत असल्याने समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
--------------------------------------
किल्ले रायगडला पसंती
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह विविध पर्यटनस्थळांवर हजेरी लावली. सलग सुट्ट्यांमुळे अलिबागमधील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे २५ हजार पर्यटक दाखल झाले होते. तर मुरूड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरूडमध्ये १५ हजारहून अधिक पर्यटक दाखल झाले होते. यासह किल्ले रायगडावर सात ते आठ हजार नागरिकांनी गेल्या चार दिवसांत भेट दिली. माथेरानमध्येही दररोज तीन ते चार हजार पर्यटक येत असल्याचे येथील स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.
---------------------------------
आम्ही नागपूरला राहतो, त्यामुळे समुद्राचे आकर्षण आहेच. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने अलिबागला आलो. येथील किनारे स्वच्छ आणि सुरक्षित वाटतात. त्यामुळे आम्ही इथे येतो. येथे लहान मुलांनाही विविध जलक्रीडा प्रकार, घोडेस्वारीचा आनंद घेता येतो.
- रिना जनबंधू, प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
---------------------------
मी मुंबईला राहत असल्याने अलिबागला आठवड्यातून एक दिवस तरी येतोच. येथील आवास, किहीम, आक्षी येथील समुद्रकिनाऱ्यावर शांतता असल्याने येथे राहायला आवडते. तसेच अलिबागचे ताजे मासेही खायला मिळतात.
- आशीष दातखिळे, नोकरदार, मुंबई
---------------------
आम्ही बरेचदा माथेरानमध्ये येतो. येथे डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या हॉटेल्समध्ये राहायला, येथील मिनीट्रेनची सफर, आल्हाददायक वातावरण फार आवडते. सध्या पाऊस असल्याने वातावरण आणखीन चांगले आहे.
- रुचा बापट, नृत्यांगना, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

