‘महाराजस्व अभियानात’ भिवंडी तहसील अव्वल
भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आले. या उपक्रमात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकांत पांचाळ, उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तहसील कार्यालयाने विशेष कामगिरी बजावून जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले आहे.
अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय सेवा थेट पोहोचवणे हे होते. त्यानुसार भिवंडी महसूल विभागाने तीन टप्प्यांमध्ये पाणंद रस्ते, आदिवासी कातकरी समाजासाठी घरकुल, आरोग्य शिबिरे आणि विविध कागदपत्रे सेवा अशा अनेक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली. या सर्व उपक्रमांतर्गत एकूण ६८९ नागरिकांना विविध सेवांचा लाभ मिळाला आहे. १२९ जणांना घरकुल लाभासाठी सहाय्य करण्यात आले आहे. या अभियानात सर्व मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, ग्राम महसूल अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भिवंडी तहसील कार्यालयाने ‘महाराजस्व अभियान’ यशस्वीपणे पूर्ण करून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे, असे तहसीलदार अभिजित खोले यांनी सांगितले.
पहिला टप्पा : पाणंद रस्त्यांची मोहीम
तालुक्यातील २४० गावांमधील गाव नकाशावर नोंद असलेले ४१२ आणि नोंद नसलेले ६८६ अशा एकूण एक हजार ०९८ पाणंद रस्त्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी आठ गावांतील २५ रस्त्यांचे सीमांकन पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित रस्त्यांची तपासणी व मोजणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.
दुसरा टप्पा : घरकुल व स्वामित्व हक्क
या टप्प्यात ५५ घरकुल आदेशांचे वितरण करण्यात आले. यामध्ये वनपट्टा क्षेत्रावरील ४० आणि गावठाण क्षेत्रावरील १५ घरकुलांचा समावेश होता. तसेच ४७ घरकुलधारकांना स्वामित्व हक्क, तर २७ कुटुंबांना कातकरी घरठाण आदेश देण्यात आले.
तिसरा टप्पा : कातकरी पाड्यांमध्ये आरोग्य शिबिरे
तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध कातकरी वाड्या आणि पाड्यांमध्ये आरोग्य तपासणी, बालकांचे लसीकरण तसेच आवश्यक शासकीय सेवा पुरविण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान ४६ नागरिकांना आधार कार्ड, ३५ जणांना आयुष्यमान भारत कार्ड, ३३७ जणांना जातीचे दाखले, २२ जणांना उत्पन्न दाखले, तसेच १४८ कातकरी विद्यार्थ्यांची जन्मनोंद नोंदविण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

