अभिनेते सतीश शाह काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन
मुंबई, ता. २५ ः आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विनोदी शैलीने छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (वय ७४) यांचे आज दुपारी हिंदुजा रुग्णालयात मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मधू शाह आहेत. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकार तसेच निर्माते व दिग्दर्शक यांनी शोक व्यक्त केला आहे.
सतीश शाह म्हणजे विनोद, सहज अभिनय आणि लोकांना आनंद देणाऱ्या कलाकृतींचे प्रतीक मानले जाते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९८४ मध्ये ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेपासून केली. त्यानंतर त्यांनी वर्षभरात ५० हून अधिक भूमिका साकारल्या. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील इंद्रवदन साराभाई या भूमिकेमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली आहे. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना अभिजात विनोदी अभिनेत्यांच्या श्रेणीत स्थान मिळवून दिले. त्यानंतर ‘हम आपके है कौन,’ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे,’ ‘मै हूँ ना’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांती ओम’सारख्या अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. टीव्ही मालिकांबरोबरच त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, माधुरी दीक्षित, सलमान खान, अनुपम खेर आदी अनेक कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.
---
मराठी, गुजराती चित्रपटातही काम
केवळ हिंदीच नाही, तर गुजराती आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. ‘वाजवा रे वाजवा’, ‘गोळाबेरीज’ या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले. सतीश यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले. दिग्दर्शक डेव्हिड धवन, अभिनेत्री काजोल, अभिनेते अनुपम खेर, बोमन इराणी, रत्ना पाठक शाह, नसीरुद्दीन शाह तसेच निर्माते जेडी मजेठिया यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

