जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
मुरबाडमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार
टोकावडे, ता. २६ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने धसई, टोकावडे, म्हसा, देहेरी, सरळगाव आणि मुरबाड परिसरातील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात आणि नाचणी या मुख्य खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, ज्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.
दिवाळी सणाच्या काळातही शेतकरी भातकापणी आणि मळणीच्या कामात व्यस्त होते. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून गंजी बांधून ठेवल्या होत्या, तर काही ठिकाणी कापणी सुरू होती, मात्र शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. कापलेल्या भाताची कडपे पूर्णपणे भिजली असून, चिखलात रुतून बसल्याने नुकसान अटळ झाले आहे. धसई, टोकावडे, देहेरी, सरळगांव, मिल्हे, वडवली, शिरवली, पळू, मुरबाड या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे ओल्या हवामानामुळे भात सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी भातात उगवण येण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाचणी पिकाला फटका
डोंगराळ आणि आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या नाचणीलाही मोठा फटका बसला आहे. माळ आणि मोरोशी परिसरात पाऊस झाल्याने नाचणीची कणसे ओलाव्याने काळवंडू लागली असून, कणसांतील दाणे खराब होण्याची शक्यता वाढली आहे.
पशुपालन व्यवसायावर परिणाम :
परतीच्या पावसामुळे पशुपालन व्यवसायही अडचणीत आला आहे. शेतात कापलेला भात आणि त्याचा पेंढा (जनावरांचा चारा) पूर्णपणे भिजला आहे. ओला पेंढा सडू लागल्याने तो जनावरांना वापरणे कठीण झाले आहे, ज्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. मुरबाड तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारी असल्याने, या नैसर्गिक आपत्तीचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसणार आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वच भागांतून होत आहे.

