थोडक्यात बातम्या रायगड
चौल येथे कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः वयाची ७५ वर्षे पुर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना अलिबाग तालुक्यातील चौल येथील नारायण नाईक प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी सर्वाहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौलचे माजी सरपंच प्रवीण राऊत, उपसरपंच अजित गुरव, ग्रामपंचायत सदस्य अतुल वर्तक, माजी सरपंच मधुकर फुंडे, चौल येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश नाईक, माजी अध्यक्ष रमेश म्हात्रे, रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे शैलेश राईलकर यांना समाज कार्य गौरव पुरस्कार, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्त व कचरा मुक्त गाव याकरीता कार्यरत असलेले राकेश काठे यांना राजाभाऊ राईलकर पर्यावरण स्नेही पुरस्कार, पत्रकार प्रफुल्ल पवार यांना लोकहितकारी पत्रकारिता पुरस्कार, आदेश नाईक व योगिता नाईक या दाम्पत्याला कृषि मित्र पुरस्कार तसेच सागर थळे यांचा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चौल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वनाथ मळेकर यांनादेखील गौरवण्यात आले. गावातील अमृत महोत्सवी वयोमान (७५ वर्षे) असलेल्या ४८ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर नाईक यांनी केले. महेंद्र नाईक यांनी आभार व्यक्त केले. तसेच सागर थळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
...........................
सनय छत्रपती शासन संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अजय मोरें
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नामांकित समाजसेवक डॉ. अजय मोरे यांची सनई छत्रपती शासन या संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समाजकार्यातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेव जाधव यांनी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.०० वाजता निजामपुर रोड हॉटेल साईराम येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला कमलाकर होवाळ, ज्येष्ठ समाजसेवक कुंडलिक थोरे, महिला संपर्क प्रमुख व रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आयटी संचलिका अंकिता मोरे, उद्योजिका स्मिता मोरे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश टेंबे, योगेश सुर्वे, महेंद्र काटकर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मोरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे सरकेल, असा दृढ विश्वास यावेळी उपस्थितांनी बोलताना व्यक्त केला. डॉ. मोरे यांनी आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत ग्रामीण भागातील जनतेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामाजिक, शैक्षणिक व संगणकीय उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांमध्ये सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण केली आहे.
................
परतीच्या पावसाने पेण तालुक्याला झोडपले
पेण (वार्ताहर) : राज्यभर गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस पडत असताना रविवारी पेणमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते; दरम्यान सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे शहरातील जनजीवन पुर्णता विस्कळीत झाले होते. ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असलेल्या पेणकरांना परतीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला. मात्र अनेक ठिकाणी शेतात कापणी युक्त झालेले भात आडवे होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरात हातगाड्यांसह पदपथावरील व्यावसायिकांची मोठी धावपळ झाली. तर साधारणपणे एक ते दीड तास पडलेल्या पावसामुळे शहरातील गटारांमध्ये पाणी साचले होते. पावसापासून बचाव करण्याकरिता पेणकरांनी पुन्हा आपल्या घरातील छत्र्या बाहेर काढल्या आहेत.
..............
नागेंद्र राठोड करणार भाजपात पक्षप्रवेश
माणगाव (वार्ताहर) ः शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संर्पक प्रमुख नागेंद्र राठोड हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शिवसेना ठकारे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. नागेंद्र राठोड यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपला बळ मिळेल, असे बोलले जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर होणारा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटात ते अनेक वर्षे काम करत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी त्यांना पक्षाकडून देण्यात आली होती. निवडणुकी नंतर रायगडमधील पदाधिकारी यांच्यात गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. २८ ऑक्टोबर रोजी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
.....................
महिला-पुरुष भजनी मंडळास साहित्य वाटप
मुरूड (बातमीदार) ः वावडुंगी ग्रामपंचायतीच्या १५ टक्के विकास निधीमधून वावडुंगी महिला व युवकांना भजन साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये हार्मोनियम, ढोलकी, चाकवे, लेझीम, मृदुंग असे विविध ४० हजार किंमतीचे साहित्य वाटप वावडुंगी ग्रामपंचायतीचे सरपंच ऋतुजा वरणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वावडुंगीचे उपसरपंच सुवर्णा भुवड, ग्रामपंचायत सदस्य गौतमी मोरे, शाहीदा कडू, नितेश वाघमारे, नीलम भुवड, जयंत कासार, उषा जळगावकर आदींसह महिला भजन मंडळी उपस्थित होते.
...........................
हाशिवरेमार्गे रेवस रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) : सलग सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी अलिबागसह रायगड किनारपट्टीला भेट दिली. समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि पर्यटनस्थळांवर दिवसभर गर्दी दिसून आली. मात्र, रविवारी परतीसाठी सर्वच पर्यटक एकाच वेळी मार्गस्थ झाल्याने विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. विशेषतः हाशिवरेमार्गे रेवस रस्त्यावर संध्याकाळी वाहतूक संथ गतीने सरकत राहिल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी पाचनंतर या मार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढू लागली. मुसळधार पावसाची शक्यता आणि रात्रीपर्यंत घरी पोहोचण्याची घाई, यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्ग टाळून मुख्य रस्त्यालाच प्राधान्य दिले. त्यामुळे अरुंद वळणांचा रस्ता, वाहन पार्किंगची अडचण आणि काही ठिकाणी रस्त्याची दुरवस्था यामुळे वाहतूक खोळंबली. अनेक वाहनचालकांना तासन्तास एका जागी अडकून रहावे लागले.
..........................
वाकी ते हरवंडीकडे जाणाऱ्या पुलाचे उद्घाटन
माणगाव (वार्ताहर) ः निजामपूर विभागातील करंबेळी ग्रामपंचायत हद्दीतील वाकी ते हरवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या पुलाचे उद्घाटन नुकतेच रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी १०० दिवसाच्या विक्रमी वेळेत या पुलाचे काम पुर्ण झाल्याने प्रशासनाचे आभार मानले. तसेच पुढील एक किमीचा रस्ता लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले. निजामपूर विभागात ज्यांचे पुर्वी कधी येणेच झाले नाही ते आता या विभागात डोकावू लागले आहेत, परंतु तुम्ही प्रामाणिकपणे एकवटलेत तर त्यांची हिम्मत नाही आपल्या उमेदवाराला पराभूत करण्याची असे वक्तव्य गोगावले यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विभागप्रमुख गणेश समेळ, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, संपर्क प्रमुख अरुण चाळके, उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, भाजप जिल्हा चिटणीस गोविंद कासार, उपतालुका प्रमुख नितीन पवार, विभागप्रमुख मनोज सावंत, जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, सरपंच बाळाराम दबडे, महिला संघटीक मुग्धा मंगेश पोळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

