पेण शहरातील खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त
पेण शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक त्रस्त
तत्काळ दुरुस्तीची मागणी; विकासकामांच्या विलंबावर नाराजी
पेण, ता. २७ (वार्ताहर) : मुंबईलगत असणारे आणि रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाणारे पेण शहर सध्या खड्डेमय रस्त्यांच्या समस्येमुळे अक्षरशः जर्जर झाले आहे. शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता उखडून खडी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि व्यावसायिक नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी एमएमआरडीएमार्फत सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये कामे चालू असून, काही कामे अजूनही अर्धवट आहेत. पावसाळ्यात रस्ते पूर्ण न झाल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले. परिणामी वाहनांना वेग कमी करावा लागत असून, अनेक वेळा छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांची तीव्रता वाढली आहे. यामध्ये पेण–खोपोली मुख्य मार्ग, नगरपालिकेसमोरील रस्ता, चिंचपाडा रोड, अंतोरे रोड, बाजारपेठ परिसर चावडी नाका ते शिवाजी चौक, गांगळ आळी, कोळीवाडा मार्ग या ठिकाणी धुळीचे प्रमाण व खडी उखडण्याचा त्रासही वाढला आहे. परिणामी दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडीचे प्रमाणही काही ठिकाणी वाढले आहे.
...................
नागरिकांचा रोष, राजकीय पक्षांचा पाठपुरावा
अयोग्य नियोजनामुळे आणि कामे विलंबाने होत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. नगरपालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी केली आहे. विकासकामे कागदोपत्री जलद दाखवली जातात, पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे, असा आरोप पेणकरांकडून केला जात आहे.
..................
कोट
पेण शहरातील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यामुळे थांबली होती; ती लवकरच सुरू होऊन ज्या ठिकाणी इतर रस्त्यांची दुरवस्था तसेच खड्डे पडले आहेत तेही रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. पेण शहर सर्वांगीण दृष्टिकोनातून सुसज्ज ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी नगर परिषद, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

