दिवाळीत पेण पोलिसांची चोख कामगिरी
दिवाळीत पेण पोलिसांची चोख कामगिरी
वाहतूक नियंत्रणासह चोरीला आळा; नागरिकांमध्ये विश्वास
पेण, ता. २७ (वार्ताहर) : राज्यासह कोकणात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवी काळात बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि मुख्य मार्गांवर प्रचंड गर्दी होत असते. अशा परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी मोठी असते. यंदाच्या दिवाळीमध्ये पेण पोलिसांनी योग्य नियोजन आणि दक्षतेच्या बळावर अत्यंत चोख बंदोबस्त ठेवत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहिली. तसेच चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा बसल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती व्यापारी केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या पेण शहरात दिवाळीच्या काळात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. १० ते १२ दिवस सतत गर्दी राहात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणि भुरट्या चोरट्यांची शक्यता वाढते. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान अधिक कठीण होते. हे लक्षात घेऊन यंदा जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ आणि पेण पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली सुसूत्र नियोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार व विभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहरात एकूण सात अधिकारी, ३५ पोलिस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे सहा कर्मचारी दिवसरात्र तैनात होते. नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे असून, त्याचा आम्हाला भरपूर लाभ झाला, असे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढेही अशाच प्रकारे समन्वय राखण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
.............
विशेष उपाययोजना
शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, पार्किंग क्षेत्रे व गर्दीच्या सर्व ठिकाणी पोलिसांची गस्त आणि कठोर लक्ष ठेवण्यात आले. वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त रस्ते मार्गदर्शन, मोडरेटर तैनाती, गर्दीला दिशा देण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामुळे दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली आणि चोरीच्या घटनांवर आळा बसला. नागरिक निश्चिंतपणे उत्सव खरेदी व सण साजरा करण्यात मग्न राहू शकले.

