मान, कंबर दुखींच्या रुग्णांमध्ये वाढ

मान, कंबर दुखींच्या रुग्णांमध्ये वाढ

Published on

चुकीच्या आसनशैलीमुळे मान, कंबरदुखी
रुग्णांमध्ये वाढ; तरुणांचा सर्वाधिक समावेश

ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) : विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात उपचारासाठी येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तरुणांचा समावेश जास्त असल्याने ही एक चिंतेची बाब बनली आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार चुकीची आसनशैली, सतत बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा यांमुळे पाठीच्या कण्यावर ताण येऊन या व्याधींची लागण होत आहे.

संगणक वा मोबाईलच्या स्क्रीनसमोर चुकीच्या पद्धतीने बसून काम करणे पाठीच्या कण्याला इजा पोहोचवणारे ठरत आहे. अशा पद्धतीचा सतत वापर केला जात असल्याने पाठीच्या कण्यापासून निर्माण होणाऱ्या व्याधींचा रुग्णांना सामना करावा लागत आहे. या व्याधींमुळे विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचारपद्धतीने उपचार केले जातात. विभागात दररोज साधारण ५० रुग्ण उपचारासाठी येत असून, यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम-थंड शेक, चुंबकीय, विद्युत, ध्वनीलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातो. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते.

कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कंबरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायात अशक्तपणा आढळून येतो, अशी माहिती विभागातील डॉक्टरांनी दिली. लॅपटॉप, मोबाईलवर वर्क फ्रॉम होम करीत असताना चुकीच्या पद्धतीने मान खाली घालून तासन्तास काम केले जाते. त्यामुळे पाठीच्या मणक्यातील स्नायूवर ताण येऊन मनक्यासंदर्भातील आजार निर्माण होतात. या कामामध्ये तरुणांचा जास्त समावेश असल्याने तरुणांना या व्याधीने गाठायला सुरुवात केली आहे. किंबहुना त्यांचाच यामध्ये जास्त भरणा आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली.

मानदुखीची लक्षणे : मानेत वेदना, चक्कर येणे, हातात मुंग्या येणे आणि अशक्तपणा

कंबरदुखीची लक्षणे : कंबरेत वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा

... तर शस्त्रक्रिया टाळता येतात
योग्य आसनशैली, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास मणक्यांच्या शस्त्रक्रिया टाळता येतात. आजच्या तरुण पिढीने शरीराचे संकेत ओळखून वेळेवर सावध झाले पाहिजे. आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि डी युक्त अन्न, दररोजचा हलका व्यायाम, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे, योग्य खुर्चीचा वापर, स्क्रीन नजरेच्या समांतर ठेवणे आणि वजन उचलताना गुडघे वाकवणे हे सोपे पण प्रभावी नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

योग्य आसनव्यवस्था, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास या व्याधी टाळता येतात. तरुणांनी आपल्या शरीराचे ‘सिग्नल’ ओळखून वेळेवर सावध होणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी खुर्ची आणि स्क्रीन नजरेच्या समांतर असणे आवश्यक आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com