सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

Published on

वाडा, ता. २७ (बातमीदार) : ऐन दिवाळीमध्ये सुरू झालेला अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले आहे. हलवार, निमगरवे, गरव्या भातपिकांची नासाडी झाली असून, कापलेल्या पिकाला मोड आले आहेत. भाताची लोंबी कंसासकट खाली पडल्याने तणही कुजून ते जनावरांनादेखील खाण्यालायक उरले नाही. जो दाणा शिल्लक आहे, त्याला मोड आल्यामुळे त्याचे पीठ होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी कुणबी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप हरड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

शेतकऱ्यांचे उरले-सुरलेले जे काही भात आहे, ते पाण्यात भिजल्याने त्याला व्यापारीही खरेदी करणार नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी घरातील दागिने गहाण ठेवून, उधार-उसनवारी, खासगी कर्ज, सोसायटी पीक कर्ज घेऊन भातशेती केली होती, मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करणे शक्य होणारच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com