दादासाहेब फाळकेंच्या नावे बनावट पुरस्काराचे प्रकरण
पुढील सुनावणीपर्यंत आरोपींवर कारवाई नको!
दादासाहेब फाळकेंच्या नावे बनावट पुरस्काराचे प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : दादासाहेब फाळके यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट चित्रपट पुरस्कार कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच पोलिसांना दिले.
चित्रपटसृष्टीत स्पॉटबॉय असलेले अनिल मिश्रा आणि मुलगा अभिषेक यांच्यावर चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आणि कॉर्पोरेट प्रायोजकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सरकार पुरस्कृत पुरस्कार सोहळा असल्याचे भासवून या पुरस्कार सोहळ्याला चित्रपट कलाकारांना उपस्थित राहण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप मिश्रा पिता-पुत्रावर आहे. या बनावट पुरस्कार सोहळ्याला विश्वासार्हता मिळवण्यासाठी त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांची बनावट पत्रे आणि छायाचित्रे वापरल्याचाही आरोप आहे. यासंदर्भात माहिती मिळताच भाजप चित्रपट संघटनेचे अध्यक्ष समीर दीक्षित यांनी तक्रार दाखल केली. त्याची दखल घेऊन वांद्रे पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (डीपीआयएफएफ) बॅनरखाली मिश्रा पिता-पुत्राने चालवलेले रॅकेट उघडकीस आणले.
मिश्रा यांनी त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासोर सुनावणी झाली. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने मूळ तक्रारदार, प्रतिवादींना नोटीस बजावली आणि ७ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली. तोपर्यंत वांद्रे पोलिसांना या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यास मज्जाव केला.
----
अडीच लाखांची तिकिटे
आरोपींनी पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, बिग एफएम, पीएनबी बँक आणि अनेक राज्यांच्या पर्यटन विभागांसारख्या नामांकित कंपन्यांकडून प्रायोजकत्व मिळवले. बुक मायशोवर महोत्सवाचा प्रचार केला आणि प्रत्येक जोडप्याला अडीच लाखांपर्यंतची तिकिटे विकली. ‘डीपीआयएफएफ’ हे नाव वापरण्यासाठी ट्रेडमार्क अर्ज यापूर्वी नाकारला असूनही त्याच नावाने मिश्रा कार्यक्रम आयोजित करीत होता. शाहरुख खान, आलिया भट्ट, रेखा, करिना कपूर आणि शाहिद कपू्र यांसारख्या कलाकारांना हा कार्यक्रम अधिकृत दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याशी संबंधित असल्याचे सांगून कार्यक्रमात उपस्थित राहण्यास भाग पाडल्याची तक्रार दीक्षित यांनी केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

