''मन की बात''मधून संस्कृत, संस्कृती, सेवेचा जागर
‘मन की बात’मधून संस्कृत, संस्कृती, सेवेचा जागर
नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात सार्वजनिक प्रक्षेपण
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून संस्कृत भाषा, संस्कृतीचे संवर्धन आणि राष्ट्रसेवेचा जागर केला. कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित सार्वजनिक प्रक्षेपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन, समाजमाध्यमांवरील तरुणांचे योगदान आणि आदिवासी वीरांच्या पराक्रमांचा उल्लेख करत देशवासीयांशी संवाद साधला. कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने जनसंपर्क कार्यालयात आयोजित सार्वजनिक प्रक्षेपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी बचत उत्सव, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तू आणि आत्मनिर्भर भारत याबाबत देशवासीयांना संबोधित केले. पंतप्रधानांनी जीएसटी बचत उत्सव, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तू आणि आत्मनिर्भर भारत यावरही देशवासीयांशी संवाद साधला. स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत सणासुदीच्या काळात मोठी वाढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन
पंतप्रधान मोदी यांनी संस्कृतला संवादाची, शिक्षणाची आणि संशोधनाची भाषा म्हणून अधोरेखित केले. गुलामगिरीच्या काळात दुर्लक्ष झालेल्या संस्कृतला आज तरुण पिढी समाजमाध्यमातून नवसंजीवनी देत आहे. त्यांनी यश साळुंके (क्रिकेटवरील संस्कृत व्हिडिओ), कमला आणि जान्हवी (अध्यात्म, तत्त्वज्ञान, संगीत), तसेच ‘संस्कृत छात्रोऽहम्’, ‘समष्टी’ आणि भावेश भीमनाथानी यांसारख्या तरुण कंटेंट क्रिएटर्सचे उदाहरण दिले. भाषा ही कोणत्याही संस्कृतीची वाहक असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘वंदे मातरम्’ला दीडशे वर्षे पूर्ण
देशाचे राष्ट्रगीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला ७ नोव्हेंबर रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. हे गीत कोट्यवधी भारतीयांना देशभक्तीची आणि राष्ट्रसेवेची जाणीव करून देणारा ऊर्जास्रोत आहे. पंतप्रधानांनी या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आणि ‘#वंदेमातरम् १५०’ या हॅशटॅगसह सूचना मागवल्या.
आदिवासी वीरांचा पराक्रम
मोदींनी इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व कोमाराम भीम यांचा उल्लेख केला. निजामच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आदिवासी समाजात आत्मसन्मान आणि संघर्षाची भावना जागृत झाली. १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिवसाचा उल्लेख करत, त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील आणि आदिवासी हक्कांच्या रक्षणाचे कार्य अद्वितीय असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेतही वंदे मातरम् उत्सव
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिममध्ये वंदे मातरम् उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. तसेच, कल्याणातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या स्तरावर या राष्ट्रगीताला अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

