सांडपाणी नियोजनासाठी जागतिक बँकेचा आधार?

सांडपाणी नियोजनासाठी जागतिक बँकेचा आधार?

Published on

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) ः उपलब्ध पिण्याचे पाणी व लोकसंख्या यात कायमच तफावत राहणार असल्याने सांडपाण्याच्या नियोजनाला महत्त्व आले आहे. सांडपाण्याचे योग्य रितीने नियोजन केले, तर पिण्याच्या पाण्याच्या मागणीत घट होऊ शकते. जागतिक बँकेने भविष्यातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्याचा पुनर्वापर या दोन मुद्यांवर भर देऊन राज्यातील ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता. २८) मिरा-भाईंदर महापालिकेला भेट दिली. या प्रतिनिधींनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे बँकेकडून महापालिकेला निधी मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य गोष्टींसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे उपलब्ध असणारे पाणी कायमच कमी पडत असते. यासाठीच सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्याचा पुनर्वापर याला महत्त्व आले आहे. जागतिक बँकेने राज्यातील काही ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांना या दोन गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील विविध महापालिकांना बँकेचे प्रतिनिधी भेट देऊन त्यांची माहिती घेत आहेत. मंगळवारी त्यांनी मिरा-भाईंदरलादेखील भेट दिली. या वेळी शहराची सध्याची लोकसंख्या, दररोज मिळणारे पिण्याचे पाणी, सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्यावरील पुनर्प्रक्रिया याची माहिती घेतली. महापालिकेकडून सुरू असलेल्या उपक्रमांची सद्यस्थिती, त्यात होऊ शकणारी प्रगती याचा आढावाही या प्रतिनिधींनी घेतला. राज्यातील सर्व महापालिकांची माहिती घेतल्यानंतर कोणत्या महापालिकांना निधी द्यायचा, याचा निर्णय बँकेकडून घेतला जाणार आहे.

मिरा-भाईंदर शहराला सध्या दररोज ‘स्टेम’ व ‘एमआयडीसी’कडून सुमारे २०० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या पाण्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन झाले तर या पाण्यापैकी सुमारे ७० दशलक्ष लिटर पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे; मात्र सध्या महापालिका चालवत असलेल्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून दररोज केवळ पाच दशलक्ष लिटर पाणीच पुनर्वापरासाठी उपलब्ध होत आहे. पुढील वर्षी सूर्या धरण पाणी योजनेचे पाणी मिरा-भाईंदरला मिळणार आहे. त्यामुळे दररोज १०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. यासाठी महापालिकेने सांडपाण्याचे नियोजन प्रभावी करणे आवश्यक आहे; मात्र त्यासाठी महापालिकेला निधीची आवश्यकता आहे.

प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर
इमारत बांधकाम, उद्याने, स्वच्छतागृहे आदींसाठी जास्तीत जास्त पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला, तर पिण्याच्या पाण्याची गरज कमी होऊ शकते. याच दृष्टिकोनातून महापालिकेला आता जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी मिरा-भाईंदर महापालिकेला भेट दिली आहे. त्यांना शहराची सद्यस्थिती समजावून सांगितली असून महापालिकेच्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली आहे. महापालिकेच्या एकंदर कारभारावर या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले असून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून महापालिकेला निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com