थोडक्यात नवी मुंबई
डीवायपाटील येथील क्रिकेट सामन्यांकरिता वाहतूक सेवा बंद
नेरुळ (बातमीदार) ः नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियम वर होत असलेल्या फाईव्ह आयसीसी महिला क्रिकेट संघाच्या सामन्यांसाठी स्टेडियम लगतच्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मागील सामन्यानंतर ३० ऑक्टोबर व २ नोव्हेबरचे सामने देखील या स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. यादरम्यान संघाच्या महिला खेळाडू व प्रेक्षक यांच्यासह अती महत्त्वाच्या व्यक्ती स्टेडियमवर येणार आहेत. यादरम्यान संभाव्य वाहतूक कोंडी व अडथळे टाळण्यासाठी स्टेडियम लगतचा मार्ग वाहतुकीला व पार्किंगसाठी बंद केला आहे. त्यामुळे भीमाशंकर सोसायटी ते एलपी पुलापर्यतचा सेवा रस्ता इतर वाहनांसाठी बंद राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
...................
बेलपाडा गावात आज पासून विठ्ठल रखुमाई उत्सव सोहळा
खारघर (बातमीदार) : बेलपाडा गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ३१ वा उत्सव सोहळा रंगणार आहे. पहाटे पाच ते सात यावेळेत अभिषेक, कलश पूजन आणि आरती तर सकाळी दहा ते बारा यावेळेत कीर्तन, बारा ते अडीच भजन आणि महाप्रसाद तर दुपारी तीन ते पाच यावेळेत भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि नऊ नंतर महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे. यावेळी हेमंत मोरे, हर्षल मगर, हरिदास पावले शास्त्री यांचे कीर्तन असणार आहे. रविवार ता. २ रोजी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेलपाडा विठ्ठल रखुमाई उत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे
...............
दारू पिण्यावरून लोखंडी रॉडने दोघांना मारहाण
नवीन पनवेल (बातमीदार) : कळंबोली परिसरात मद्यपान करण्याच्या कारणावरून दोन तरुणांना लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कृष्णकांत कंठाळे आणि त्याचा मित्र अमन यादव हे सेक्टर ४ मधील मॅकडोनाल्डजवळील गॅरेज परिसरात खुर्चीवर बसून मद्यपान करत होते. यावेळी तेथे राहणारा करण नाईक आणि एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी आले. येथे मद्यपान करण्याची परवानगी कोणी दिली?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतापाच्या भरात लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीमध्ये कृष्णकांत आणि अमन दोघांनाही दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी कृष्णकांत कंठाळे यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ आरोपी करण नाईक आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती कळंबोली पोलिसांनी दिली.
..................
अज्ञात चोरट्याकडून मोबाईलसह लॅपटॉपची चोरी
नवीन पनवेल (बातमीदार) : पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करंजाडे सेक्टर २ येथे चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घरात शिरून दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरी केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तक्रारदार केदार चौधरी हे एका कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते घरी परतल्यावर त्यांनी दरवाजा उघडा ठेवून साफसफाई सुरू केली. दरम्यान, त्यांनी टीपॉयवर लॅपटॉप आणि दोन मोबाईल ठेवले होते. ते किचनमध्ये गेल्याची संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. चोरी झाल्याचा आवाज किंवा हालचाल त्यांच्या लक्षात आली आणि ते हॉलमध्ये परत आले, तेव्हा टीपॉयवर ठेवलेल्या वस्तू गायब असल्याचे दिसून आले. चोरटा घरातून बाहेर जाताना दिसला असला तरी त्याची ओळख पटू शकली नाही. योग्य वेळी सतर्कता न राखल्याचा फायदा घेत चोरट्याने ही चोरी केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर केदार चौधरी यांनी तत्काळ पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
..................
उरण यु.ई.एस. स्कूलमध्ये नौदल आरोग्य शिबिर
उरण (वार्ताहर) : नौदल सप्ताह २०२५ चा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या आयएनएचएस सांधाणी आणि नौदल स्टेशन करंजा यांच्या संयुक्त विद्यमाने उरण एज्युकेशन सोसायटी (यू.ई.एस.) स्कूल, ज्युनियर कॉलेज व कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. पालक मैदानावर भरविण्यात आलेल्या या शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. ४०० पेक्षा जास्त रहिवाशांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वेस्टर्न नेव्हल कमांडचे कमांड मेडिकल ऑफिसर सर्जन रिअर ॲडमिरल के. एम. अधिकारी यांच्या हस्ते झाले. या शिबिरात जनजागृतीसोबतच विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली. डॉक्टर, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ, दंतवैद्य, त्वचारोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ आणि मानसोपचार सल्लागार अशा तज्ज्ञांची टीम या शिबिरात कार्यरत होती. नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह तपासणी, दंत तपासणी, डोळे तपासणी यांसह विविध तपासण्या केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

