कर्जतमध्ये पार्किंगसह वाहतूक कोंडीची समस्या

कर्जतमध्ये पार्किंगसह वाहतूक कोंडीची समस्या

Published on

कर्जतमध्ये पार्किंगसह वाहतूक कोंडीची समस्या
उपाययोजनांची मागणी; शहर बचाव समितीकडून प्रशासनाला निवेदन
कर्जत, ता. २९ (बातमीदार) : कर्जत शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या अधिकच तीव्र होत चालली आहे. मुख्य रस्त्यांवर अनियोजित पार्किंग, रिक्षांचे मनमानी थांबे, बाजारपेठेतील अतिक्रमणे आणि वाहतूक पोलिसांची अपुरी उपस्थिती या सर्वांचा फटका रोजच्या प्रवाशांना बसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत शहर बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शहरातील श्रीराम पूल, छत्रपती संभाजी महाराज चौक, चारफाटा, स्‍थानक परिसर इत्यादी ठिकाणी विशेषतः शनिवार-रविवारी गंभीर कोंडी निर्माण होते. वन-वे नियम लागू करून काहीसा दिलासा मिळतो, परंतु नियमांची काटेकोर अंमलबजावणी नसल्याने परिस्थिती पुन्हा बिघडते. म्हणूनच वाढीव वाहतूक पोलिसांची नेमणूक करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहर बचाव समितीकडून या वेळी करण्यात आली. बाजारपेठेत हातगाड्या आणि परवानग्याच्या अर्धवट अंमलबजावणीमुळे पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण होते आहे. त्यामुळे शुक्रवारचा बाजार पोलिस मैदानावर हलवावा तसेच शनिवार बाजाराचा दिवस योग्य पुनर्विचाराने बदलावा, अशी सूचना समितीकडून करण्यात आली. शिवाय भिसे खिंड परिसरातील बेकायदा छोटे व्यावसायिक नियोजित जागी हलविल्यास वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे समितीचे मत आहे. या वेळी पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याचे प्रश्नही समितीने मांडले. विश्वनगर टेकडी भागात पुरेशा दाबाने पाणी न येणे, दहिवलीत नळातून गढूळ पाणी येणे याबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली. नवीन इमारतींना परवाना देताना पार्किंगची सक्ती करण्यासाठी रेरा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, वाढीव रिक्षा स्टँड तसेच एक्स्प्रेस फीडरद्वारे स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची गरज समितीने व्यक्त केली.
..............
मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी नागरिकांच्या सहकार्याने या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. वाहतूक सुधारणा घडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस प्रशासनाने दिली. नगर परिषदेकडून सिग्नल यंत्रणा सुरू करणे, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही कॅमेरे, गटारे दुरुस्ती यांसारखी अनेक कामे मार्गी लावल्याबद्दल समितीने मुख्याधिकारी चव्हाण यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com