दिघा गाव स्थानक चौकात वाहतूक कोंडी
दिघा गाव स्थानक चौकात वाहतूक कोंडी
पादचारी पूल तातडीने उभारण्याची नागरिकांची मागणी
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे–ऐरोलीदरम्यान दिघा गाव रेल्वे स्थानक सुरू होऊन आता जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या स्थानकाच्या कार्यान्वयनानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र ठाणे-बेलापूर रोडवरील वाहनतळ आणि पादचाऱ्यांच्या अनियंत्रित वर्दळीमुळे येथे दररोज सकाळ-सायंकाळ तीव्र वाहतूक कोंडी होत असून, ही स्थिती दिघा ग्रामस्थांच्या पाचवीला पुजणारी समस्या बनली आहे.
रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आनंदनगर, गणपतीपाडा, ईश्वरनगर आणि रामनगर वसाहतीतील नागरिक मोठ्या प्रमाणात या स्थानकाचा वापर करीत आहेत. तसेच स्थानकाच्या पश्चिम बाजूस असलेल्या ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी स्थानकातून बाहेर पडणाऱ्या पादचाऱ्यांचे लोंढेच्या लोंढे थेट मुख्य रस्त्यावर येतात. पादचारी पूल नसल्याने जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याची वेळ नागरिकांवर येते. येथे सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतरही त्याचा प्रभावी वापर न झाल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. स्थानक परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतींच्या बांधकामामुळे लोकसंख्या वाढणार असून, वाहतूक कोंडी भविष्यात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कळवा ते दिघा असा मोठा पट्टा दररोज वाहतूक कोंडीने त्रस्त असतो. या कोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे पादचारी सुरक्षेला प्राधान्य देऊन या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
....................
पुलासाठी निधी उपलब्ध, पण काम रखडले
दिघा गाव रेल्वेस्थानकासमोर पादचारी पूल उभारण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नवी मुंबई व ठाणे महापालिकेकडे वारंवार मागणी केली आहे. यासाठी आमदार गणेश नाईक यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी दिली. दरम्यान, विविध कारणांनी पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे पुलाच्या अभावामुळे पादचाऱ्यांना सततचा धोका आहे. शिवाय या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने तातडीने पादचारी पूल उभारणे हाच एकमेव शाश्वत उपाय असल्याचे नागरिकांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

