

पोलिसांच्या तत्परतेने १४ लाख मिळाले
ऐरोलीतील ऑनलाइन फसवणूक झालेल्या महिलेला दिलासा
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) ः शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाच्या भूलथापा देऊन ऐरोलीतील एका महिलेला २० लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणात रबाळे पोलिसांच्या सायबर पथकाने तत्काळ कारवाई केल्याने १४ लाख ७० हजार रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.
ऐरोलीत राहणाऱ्या महिलेने लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर नाव नोंदवले होते. एका सायबर चोराने याच संधीचा फायदा घेत शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून तब्बल २० लाख रुपये उकळले होते; पण फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. या वेळी पोलिसांच्या पथकाने बँक खात्यांवरील रक्कम थांबण्याची न्यायालयीन प्रक्रिया केली. त्यामुळे तब्बल १४ लाख ७० हजारांची रक्कम महिलेला परत करण्यात यश आले.