मुंबईत दुचाकी चोरून विकायचा जळगावला!
मुंबईत दुचाकी चोरून विकायचा जळगावला!
रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड; १४ हून अधिक गुन्ह्यांची नोंद
अंधेरी, ता. ३० (बातमीदार) ः दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. सुनील सुभाष चौधरी असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध १४ हून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तो मुंबईत दुचाकी चोरून गावी जळगावला नेत होता.
या गुन्ह्यातील दोन बुलेट पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये रवी कंडेरा हा तरुण राहात असून, तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. १५ ऑक्टोबरला त्याने त्याची दुचाकी मालाडच्या इनॉर्बिट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ही दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती.
गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून आरोपी मालवणीतील मढ परिसरात गेल्याचे उघडकीस आले. हाच धागा पकडून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र आव्हाड, पोलिस निरीक्षक अमीत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोळकर, पोलिस अंमलदार भूषण भोसले, नितीन दळवी, निशिकांत शिंदे, मिथून गावीत यांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. चार दिवस पाळत ठेवून पथकाने सुनील चौधरीला ताब्यात घेतले होते.
सुनील हा मूळचा जळगावचा रहिवासी असून, तो मुंबई शहरात दुचाकी चोरी करत होता.
जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा करायचा गुन्हे
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर सुनील हा वारंवार असे गुन्हे करत होता. गुन्हा करताना तो चांगला पेहराव करून तोंडावर मास्क व पाठीवरील बॅगेत हेल्मेट आणि कटर ठेवत होता. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दोन बुलेट दुचाकी हस्तगत
दोन वर्षांत त्याने विलेपार्ले, वर्सोवा, आरे, बांगुरनगर, मुलुंड आणि आंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १४ हून अधिक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. दुचाकी चोरून तो जळगाव येथील गावी नेत होता. त्याच्या अटकेने इतर तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन गुन्ह्यांतील दोन बुलेट पोलिसांनी हस्तगत केली आहे.

