पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश
पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश
महाविकास आघाडीचा सिडकोवर मोर्चा
पनवेल, ता. ३० (बातमीदार) : नवीन पनवेल शहरात सणासुदीच्या काळापासून तीव्र पाणीटंचाई आहे. दीर्घकाळापासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना सिडको प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शहरातील पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी रात्रभर वणवण करावी लागत आहे. तरी सिडकोचे अधिकारी बेफिकीरपणे वागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. यापूर्वीही लेखी पत्रव्यवहार, बैठका आणि मागण्या करूनही सिडको प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने अखेर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली. सिडको प्रशासन जागे व्हा!, पाणी द्या नाहीतर खुर्ची सोडा, घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले. या आंदोलनात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे हरेश केणी, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, मनसे प्रवक्ता योगेश चिले, शेकाप नेते काशिनाथ घरत, नारायण घरत, महिला आघाडी संघटिका मालती पिंगळा, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे सहभागी झाले होते.
़़़़़़़़़़़ः------------------------------
पुन्हा आंदोलनाचा इशारा
आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर अधिकाऱ्यांनी उद्यापासून पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन दिले, पण पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागला, तर सिडकोविरोधात पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.

