कंटेनर आणि दोन कारचा अपघात; एकाचा मृत्यू
कंटेनर-कारच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू
नालासोपारा, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार हद्दीत बुधवारी (ता. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास कंटेनर आणि दोन कार यांच्यात अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण जखमी आहेत. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गुजरात मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा टायर पेल्हार हद्दीत अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनरने रस्त्यावरील दुभाजक तोडला आणि तो पुलावरून खाली कोसळला. त्यामुळे खालील बाजूने जाणाऱ्या दोन कारला धडक बसली. या अपघातात अंजली दुबला (वय ३८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असल्याने रस्त्याची उंची वाढली आहे; मात्र दुभाजकांची उंची वाढलेली नाही. यामुळे अपघातग्रस्त वाहने थेट दुसऱ्या मार्गिकेवर येतात. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या उंचीनुसार दुभाजकांची उंची वाढवावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक पंकज पाटील यांनी केली आहे.

