यु टाईप रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

यु टाईप रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

Published on

कल्याण पूर्वेत वाहतूक कोंडीतून दिलासा
‘यू टाईप’ रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात; अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून पाहणी दौरा

कल्याण, ता. ३० (बातमीदार) : शहरातील पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘यू टाईप’ रस्त्याचा (८० फूट रुंदी) प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (ता. ३०) कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत या प्रस्तावित रस्त्याचा पाहणी दौरा केला.

तिसगाव नाका ते सिद्धार्थ नगर आणि पुढे गणेश मंदिर चौक ते काटेमानिवली असा रस्ता आहे. या रस्त्याचे काम ७४ कोटी रुपयांच्या निधीतून केले जाणार आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, मात्र पुनर्वसन आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिथे शक्य आहे, तिथे लवकरच काम सुरू करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

तिसगाव नाका ते सिद्धार्थ नगर, पुढे गणेश मंदिर चौक ते काटेमानिवली या प्रस्तावित ८० फूट रुंदीच्या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय पातळीवरून वेग आला आहे. सध्या सुरू असलेला पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतरच हे काम हाती घेतले जाईल, असे सांगण्यात आले आहे, मात्र त्यापूर्वी विस्तापितांचे पुनर्वसन, नुकसानभरपाई आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत. सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत जिथे काम सुरू करणे शक्य आहे, तेथील भागात येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णपणे थांबताच सुरुवात केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. शहर अभियंता अनिता परदेशी, सहाय्यक आयुक्त सविता हिले (प्रभाग ४-जे), आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे, माजी शहरप्रमुख महेश गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख सचिन पोटे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यानंतर कामाचे नियोजन केले जाणार असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण पूर्वेतील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

‘‘रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी कार्यक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी, तसेच विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन प्राधान्याने व्हावे, ही आग्रही भूमिका मांडण्यात आली.’’
सुलभा गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व

‘‘पूर्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सर्वपक्षीय कायम एकवटतील.’’
नीलेश शिंदे, शहरप्रमुख, शिवसेना

‘‘रस्ता रुंदीकरणात एकाही बाधिताला पुनर्वसनापासून वंचित राहू दिले जाणार नाही, यासाठी प्रशासनाकडे योग्य मार्गाने पाठपुरावा केला जाईल.’’
महेश गायकवाड, माजी नगरसेवक

Marathi News Esakal
www.esakal.com