वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा काढा

वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा काढा

Published on

वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा काढा
खासदार रवींद्र वायकर यांची सूचना
जोगेश्‍वरी, ता. ३० (बातमीदार) ः मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आगामी काळात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्‍यामुळे गारगाई व पिंजाळ धरण प्रकल्प तातडीने राबवावा, अशी सूचना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे. संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे तत्काळ पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील अनेक भागांमध्ये कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींवरून खासदार वायकर यांनी २८ ऑक्टोबरला के-पूर्व पालिका कार्यालयात अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीस जल अभियंते, विभागीय अधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. खासदार वायकर यांनी जीर्ण पाणीपुरवठा वाहिनी बदलणे, गढूळ पाण्याच्या तक्रारी तातडीने दूर करणे, अतिरिक्त पंप बसवणे, नवीन वाहिनी टाकणे याबाबत सूचना दिल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारींची नोंद घेऊन लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला मुंबई महापालिकेचे जल अभियंता, नियोजन विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोंडे, विभागीय कार्यालातील उप जल अभियंता परब, राकेश शिंदे, पारेख, मोईन शेख, एमएमआरडीए अभियंता प्रफुल्ल जमादार, नगरसेविका राजुल पटेल, रेखा रामवंशी, प्रीती सातम, चंद्रावती मोरे, लोचना चव्हाण आदींची उपस्‍थिती होती.

Marathi News Esakal
www.esakal.com