आचारसंहितेपुर्वी पालिकेचा निधी खर्च करण्यासाठी लगबग

आचारसंहितेपुर्वी पालिकेचा निधी खर्च करण्यासाठी लगबग

Published on

आचारसंहितेआधी कामांचा पाऊस
पाच वर्षांनंतर दालनांना रंगरंगोटी; निधी खर्च करण्याची लगबग
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीने पालिका प्रशासनात निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दालनांसह पालिका अधिकारी व महत्त्वाच्या विभागांच्या कार्यालयांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी या दुरुस्ती कामांसाठी पाहणी सुरू केली असून, अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी लाखो रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्याची लगबग सुरू आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत नोव्हेंबर २०२०पासून लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात आली असून, गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे पालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने हा कालावधी वाढला. यामुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रभागरचना जाहीर झाली असून, लवकरच आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. आगामी निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही महिन्यांत लागू होण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने बंद असलेल्या लोकप्रतिनिधींची कार्यालये आणि महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यालयांच्या डागडुजी व दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दुरुस्तीच्या कामांचे इस्टिमेट बनवून निविदा काढून, वर्क ऑर्डर काढण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी धावपळ करीत असल्याचे दिसत आहे. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी कार्यालये सुस्थितीत बनवून ठेवण्याचा उद्देश असला तरी प्रशासनाच्या मंजुरीने कोट्यवधी रुपयांची कामे आपल्या हितसंबंधातील ठेकेदारांना मिळवून देण्याचा घाट रचला जात असल्याची चर्चा आहे.

पाहणी करून दुरुस्तीची कामे
पालिका मुख्यालयातील कार्यालयांची पाहणी करून दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांनी दिली. ही कामे मोठ्या खर्चाची असल्याने ई-टेंडरिंगद्वारे निविदा काढून पूर्ण केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com